प्रकाश आंबेडकरांनी भाजपला स्पष्ट नकार देत इतर पक्षांशी युतीचा प्रस्ताव दिला. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका ठरणार आहे निर्णायक.
राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी स्पष्टपणे जाहीर केले की, आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे दूर ठेवत इतर सर्व राजकीय पक्षांशी युती करण्याची तयारी त्यांची आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा मोठा खुलासा केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोग व सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकांची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आलेली ही भूमिका राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
स्थानिक सज्जता
प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानुसार, वंचित बहुजन आघाडी राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सज्ज झाली आहे. युतीचे अधिकार जिल्हा स्तरावर जिल्हा समित्यांना देण्यात आले आहे. भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची तयारी आहे. मात्र, अंतिम निर्णय महाराष्ट्र प्रदेश कमिटी घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : माजी अर्थमंत्र्यांनी शोधले लॉटरीच्या ‘जॅकपॉट’ मागील आर्थिक गणित
निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवत निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे. सरकारने आता तातडीने प्रभाग रचना जाहीर करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी वॉर्ड पद्धत, तर काही ठिकाणी प्रभाग पद्धत आहे. त्यामुळे नेमके तीन प्रभाग ठेवणार की चार, याचा निर्णय सरकारने स्पष्ट करावा, असेही त्यांनी नमूद केले.
सीमांकन प्रक्रिया
उमेदवारांना आपापल्या मतदारसंघाची माहिती वेळेवर मिळावी, यासाठी प्रभाग रचना लवकरात लवकर घोषित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी सीमांकन प्रक्रियाही तातडीने सुरू केली जावी. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीमांकन समित्या गठीत कराव्यात, अशी ठोस मागणी त्यांनी केली.
वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील एक प्रभावशाली राजकीय घटक असून, अनेक जिल्ह्यांमध्ये या पक्षाचा ठोस जनाधार आहे. यामुळेच राज्यातील इतर प्रमुख पक्षांना आपली रणनीती ठरवताना वंचितच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहावे लागते. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तो काही कारणास्तव यशस्वी झाला नाही.
Devendra Fadnavis : विकासाच्या सप्तपदीने महाराष्ट्राचा महायात्रा आरंभ
आता मात्र प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांपुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. यावेळी महाविकास आघाडी व इतर पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा खेळ निर्णायक ठरू शकतो, आणि त्यामुळेच या पक्षाचे धोरण, युतीचे प्रस्ताव आणि प्रभाग रचनेबाबतची भुमिका आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं ठरवणार आहे.
