महाराष्ट्र

Gulabrao Patil : कालपर्यंत साहेब-साहेब करणारे, आज ‘बाप’ म्हणतायेत

Maharashtra Budget Session : विधिमंडळात पाटील ठाकरेंना भिडले

Post View : 25

Author

विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. या वादामुळे विधिमंडळात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यावेळी हा संघर्ष एका वेगळ्याच पातळीवर गेला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी जे काही घडलं, ते केवळ राजकीय वादविवाद नव्हता, तर शिवसेनेच्या फाटाफुटीचे आणि सत्तासंघर्षाचे जीवंत चित्रण होतं. ठाकरेंचा नवा आवाज विरुद्ध शिंदे गटाचा ‘सत्ता अहंकार’ असं काहीसं या घडामोडींचं स्वरूप होतं.

ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी सभागृहात जोरदार वादविवाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, गुलाबराव पाटलांनी चक्क ‘तुमच्या बापाने मला खातं दिलं होतं’ असं वक्तव्य करून खळबळ माजवली. या वादावादीत शब्दांच्या फेकाफेकीसोबतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आणि विधिमंडळ अक्षरशः रणांगण बनले.

Dhananjay Munde : भंडाऱ्याच्या वाल्मिक कराडचा काळा चिठ्ठा तयार

राजकीय तणाव

सुरुवात झाली ती आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांमधून. आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत मंत्रीमहोदयांचा अभ्यास कमी असल्याचं सांगितलं. ‘मंत्र्यांनी अभ्यास करावा, माहिती नसेल तर उत्तर राखीव ठेवावं. पण मंत्र्यांना खातं कळालंय का नाही, हा प्रश्न आहे,’ अशी खोचक टीका त्यांनी केली. यावर पाटलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत, ‘मला खातं कळतं म्हणूनच त्यांच्या बापाने मला खातं दिलं होतं,’ असा वादग्रस्त पलटवार केला.

सभागृहात क्षणातच गदारोळ माजला. ठाकरेंच्या समर्थक आमदारांनी याला तीव्र विरोध केला. मात्र स्वतःची चूक लक्षात आल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी लगेचच ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ असा शब्दप्रयोग करत आपल्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत हा वाद पेटला होता.

गुलाबी राजकारण

गुलाबराव पाटील हे एकेकाळी ठाकरे गटाचे कट्टर समर्थक होते. मातोश्रीवरील आदेश त्यांच्यासाठी अंतिम असायचा. पण शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनीच आदित्य ठाकरेंचा अपमान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

कधीकाळी उद्धव ठाकरेंच्या छायेत असलेले पाटील आता शिंदे गटात जाऊन पूर्णपणे बदलले आहेत. शिवसेनेत असताना ‘ठाकरे कुटुंब हाच आमचा देव’ म्हणणारे गुलाबराव पाटील आता मात्र ‘आम्ही स्वतंत्र आहोत’ असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा बदल सत्ता मिळाल्यामुळे आहे की निष्ठेचा, यावर संशय व्यक्त केला जातोय.

गद्दारीवरून टोलेबाजी

संपूर्ण वादात आणखी एक महत्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे गद्दारीचा. आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर ‘म्हणूनच तुम्ही पळून गेलात’ अशी टीका करत शिंदे गटाच्या बंडखोरीवर निशाणा साधला.

गुलाबराव पाटील यावर शांत बसले नाहीत. त्यांनी ठाकरे गटाला लक्ष्य करत, ‘आम्ही गद्दार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी बाहेर पडलो आहोत,’ असं स्पष्टीकरण दिलं. पण, विरोधी पक्षाला ते पचले नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!