नागपूर शहर लवकरच सिमेंटच्या भिंतींवर हिरवळ फुलवणार आहे. नाल्यांच्या सुरक्षात्मक भिंतींवर उभे राहणारे वर्टिकल गार्डन्स शहराच्या सौंदर्यात नवा प्राण फुंकतील.
नागपूर शहर लवकरच एक अभिनव आणि सौंदर्यपूर्ण परिवर्तनाचा साक्षीदार ठरणार आहे. शहरातील नागा नदी, पोहरा नदी आणि प्रमुख नाल्यांवर उभारण्यात आलेल्या पुलांच्या सुरक्षात्मक भिंती आता केवळ संरक्षक नसून निसर्गरम्य ‘वर्टिकल गार्डन’चे घर ठरणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे ना फक्त शहराचे सौंदर्य वाढणार आहे, तर पर्यावरण रक्षणालाही हातभार लागणार आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये नागा नदी, पोहरा नदी आणि इतर मोठे नाले प्रवाहित आहेत. या प्रवाहांवर व शहराच्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलांवर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या भिंतींवरून नागरिक अनेकदा थेट नाल्यांमध्ये कचरा फेकताना दिसतात. ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेने यावर एक नाविन्यपूर्ण उपाय शोधला आहे. सुरक्षात्मक भिंतींवर उभे बागेचे (Vertical Garden) साजेसं सजावट करून त्या भागाचं रूपांतर हिरवळीत करणे.
सौंदर्यीकरणाची सुरुवात
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी त्यांनी या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवत स्पष्ट निर्देश दिले आहेत. चौधरी म्हणाले की, नाल्यांमध्ये कचरा फेकणं थांबवण्यासाठी आणि रस्त्यांच्या सौंदर्यवर्धनासाठी वर्टिकल गार्डन लावावेत. त्यामुळे रस्ते अधिक आकर्षक दिसतील आणि नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होईल.
या उपक्रमांतर्गत सुरुवातीला शहरातील 15 निवडक ठिकाणी वर्टिकल गार्डन्स उभारले जाणार आहेत. यासाठी अंदाजे 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या गार्डन्समध्ये आकर्षक आणि कमी देखभालीची गरज असलेली झाडे लावण्यात येणार आहेत.
ज्यामध्ये रिहो प्लांट, जेड प्लांट, पांडनस, पर्पल हार्ट आणि विडेलिया सारख्या शोभिवंत व पर्यावरणपूरक वनस्पतींचा समावेश असेल. या भिंतींवर लावले जाणारे गार्डन सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे, त्यांची सुरक्षा लक्षात घेता गार्डन्सच्या समोर जाळ्यांचं संरक्षणही करण्यात येणार आहे.
Chandrapur : सत्ता हातात, मंत्रीही आपलाच, तरीही न्याय अडकलेलाच
कामाला होणार सुरुवात
महापालिकेच्या तांत्रिक विभागाने आधीच शहरातील विविध मुख्य रस्त्यांवरील नाल्यांची पाहणी करून 15 उपयुक्त ठिकाणांची निवड केली आहे. या ठिकाणी लवकरच निविदा मागवून कामाला सुरुवात केली जाणार आहे. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.
या अभिनव उपक्रमामुळे नागपूर शहरात एक सकारात्मक आणि हरित परिवर्तन घडणार आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम असलेला हा प्रकल्प भविष्यात इतर शहरांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरू शकतो. महापालिकेचा ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ शहराच्या सौंदर्यवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, नागपूरकरांनीही यामध्ये सहभागी होऊन शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यास हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
