महाराष्ट्र

Bachchu Kadu : बैलही आता बनणार आंदोलनाचे ब्रँड ॲम्बेसेडर

Amaravati : शेतकऱ्यांच्या मुद्यावर बच्चू कडू आक्रमक

Post View : 40

Author

जनतेच्या हक्कासाठी लढणारे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली. अन्यायाविरोधात उभं राहत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू गेल्या काही महिन्यांपासून थेट संघर्षाच्या मैदानात आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही त्यांची अखंड मागणी आहे. अन्नत्याग आंदोलन, पदयात्रा आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. मात्र सरकारकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीही प्रत्यक्ष कृती झालेली नाही, असा कडूंचा आरोप आहे.

येत्या 22 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी यंदाचा पोळा शेतकरी संघर्षाचा पोळा म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करताना शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या जरीवर ‘सातबारा कोरा-कोरा’ आणि ‘शेतकरी कर्जमुक्ती हवीच’ अशी घोषवाक्ये लिहावीत, अशी हाक त्यांनी दिली आहे.

Yashomati Thakur : मोदी सरकारचा हुकूमशाही मार्ग लोकशाहीसाठी धोकादायक

संघर्षाला पोळ्याचे व्यासपीठ

कडू म्हणतात, हा पोळा फक्त आनंदाचा किंवा उत्सवाचा न राहता कर्जमुक्तीच्या चळवळीला धार देणारा ठरला पाहिजे. गावोगावी, बैलांच्या अंगावरील प्रत्येक जरीवर शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारे संदेश लिहून सरकारच्या उदासीनतेविरोधात ताकद दाखवण्याचे त्यांनी सुचवले आहे. गावातील नागरिक, कार्यकर्ते, शेतकरी या सर्वांनी मिळून या संकल्पनेला व्यापक रूप द्यावे, असे त्यांचे मत आहे. कर्जमाफीसाठीच्या लढ्यात शेतकरी एकत्र आले तरच सरकारला जबाबदार ठरवता येईल, या विश्वासाने बच्चू कडूंनी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 138 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या यात्रेला शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसेसह विविध पक्षांनीही पाठिंबा दिला होता.

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने आजवर पूर्ण झाली नाहीत, अशी तीव्र टीका कडू करतात. आश्वासने देऊन प्रत्यक्ष कृती शून्य ठेवण्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन केवळ कर्जमाफीसाठी एकजूट निर्माण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचा आजचा जीवनक्रम दुहेरी संकटांनी वेढलेला आहे. शेतमालाला हमीभाव नाही, जुने कर्ज थकलेले असल्यामुळे नवे कर्ज मिळत नाही, सावकारी जाच वाढला आहे. बँकांच्या नोटिसांचा विळखा घट्ट होत चालला आहे. या सगळ्याच्या छायेत शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, अपमान आणि कुचंबणा वाढत आहे. शेवटी आत्महत्येची विवशता हा त्यांच्या जीवनाचा भाग बनत चालला आहे.

Mira Borwankar: खाकीचे राजकारण, न्यायाचे अडथळे

संघर्षाचा पोळा

यंदाचा पोळा हा केवळ परंपरेचा नव्हे तर संघर्षाचा सण म्हणून इतिहासात नोंदला जावा, अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा लढा आता प्रत्येक गावातल्या प्रत्येक बैलाच्या जरीवर दिसला पाहिजे, असा त्यांचा निर्धार आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा करून दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, यासाठी हाच खरीखुरी शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याची वेळ असल्याचे ते म्हणतात.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!