महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : कचरा साफ होऊ दे, नव्या दमाची हवा भरू दे 

Congress : वडेट्टीवारांचा काँग्रेसमधील इनसाइड क्लिनअपवर घणाघात

Share:

Author

काँग्रेसच्या अंगणात आता झाडू लागलाय. सत्ताभुकेच्या गंजलेल्या खुर्च्या बाहेर फेकल्या जात आहेत. राजकीय स्वच्छतेच्या या मोहिमेत जुने चेहरे हरवणार आणि नव्या विश्वासाचं नवं पर्व उजाडणार, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडण्याची नवी लाट उठताना दिसत आहे. अनेक नेते भाजप आणि शिंदे गटाच्या दिशेने वळले आहेत. काँग्रेसचे अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप आणि शिंदे गटात जाण्याची शक्यता जोर धरते आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. कचरा जितका लवकर साफ होईल, तितकं पक्षासाठी चांगलं, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

वडेट्टीवार यांनी भाजप व शिंदे गटातील हालचालींवर सडकून टीका करताना सांगितले की, सत्तेशिवाय राहू न शकणारे, पदासाठी बेईमानी करणारे लोक आता बाहेर पडत आहेत. यातून काँग्रेस स्वच्छ होत आहे. ही राजकीय स्वच्छता आवश्यकच होती. आता नव्या दमाचे, निष्ठावान कार्यकर्ते उभे राहतील. हेच पक्षाचं भविष्य ठरवतील.

भाजपवर निशाणा 

वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवरही बोट ठेवलं. भाजपचा डाव स्पष्ट आहे, आधी एका गटाचा वापर करा आणि मग दुसऱ्याला जवळ करा. काँग्रेसला कमजोर करण्याचा हा खेळ आहे. भाजपचे ‘यूज अँड थ्रो’ धोरण राज्यात पुन्हा दिसते आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सुरु असलेल्या अनिश्चिततेवरही त्यांनी परखड भाष्य केले. भरत गोगावले फक्त मिशी पिळत राहतात, कृती काही नाही. त्यांनी आपल्या स्वभावानुसार रोखठोक भूमिका घ्यावी. फक्त खुर्चीवर बसून नाटक केल्याने काही होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी गोगावले यांच्यावर निशाणा साधला.

मोदींवर टीका

भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान मोदी ट्रम्पसमोर गप्प का बसतात? युद्ध थांबवण्याचे श्रेय ट्रम्पने घेतले, म्हणजे भारत अमेरिकेच्या दबावात आहे हे स्पष्ट होते. ही सरकारची कमजोरी आणि अपयश आहे. पाकिस्तानविरुद्ध नेहमीच विजय मिळवणाऱ्या देशाने दोन पावलं मागे का घ्यायची?

राजकीय क्षेत्रात सध्या मोठी घरसाफाई सुरु आहे. सत्तेसाठी झुकणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत काँग्रेस आता नव्या दमाच्या नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. ‘कचरा साफ’ करण्याचा हा निर्णय पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाईल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!