विजय वडेट्टीवार यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही सरकारने कोणतीही ठोस मदत न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तूर, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला यासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र, या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सरकारच्या मंत्र्यांची वक्तव्ये अधिकच वादग्रस्त ठरत आहेत. नुकतेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट शेतकऱ्यांना सुनावले आहे. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता? शेतीत गुंतवणूक करता का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, बहुमत मिळाल्याने सरकारला वाटते की त्यांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्यायचे नाही. त्यांनी सरकारला दोषी ठरवत असेही सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. मात्र मदतीबाबत कोणतीही स्पष्टता नाही. पंचनामे करायलाही सरकारला वेळ नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावरच दोष टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, गेल्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कोकाटेंवर टीका
वडेट्टीवार म्हणाले की, मदतीचा विचार नंतर करा, पण पंचनामे तरी करा. त्यांच्या मते, सरकार शेतकऱ्यांशी बेईमानी करत असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीबाबत विचारणा केली असता, कोकाटे म्हणाले, जे नियमित कर्जफेड करतात, त्यांनीच करावी. कर्ज घ्यायचे आणि मग पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहायची, हे योग्य नाही. त्याचबरोबर, पीक विम्याचे पैसे मिळाल्यावर शेतकरी साखरपुडे आणि लग्न करतात, असे विधानही त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा देत म्हटले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले सरकार टिकणार नाही. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा हे सरकार सत्तेत राहू देणार नाही. शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना, सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे त्यांचा संताप अधिकच वाढत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले आहे. मात्र सरकारकडून मदत करण्याऐवजी उलट शेतकऱ्यांना प्रश्न विचारले जात आहे. त्यांच्यावर आरोप केल्या जात आहे. मात्र यावर आता सरकार काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या बळीराजाचे लक्ष लागले आहे.
