गोव्याच्या भूमीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी हक्कांच्या लढ्यासाठी पुन्हा रणशिंग फुंकले. जातनिहाय जनगणना, आरक्षणवाढ आणि 100 टक्के शिष्यवृत्तीच्या मागण्यांनी त्यांच्या भाषणाने वातावरण पेटवले.
जातनिहाय जनगणनेपासून आरक्षणवाढीपर्यंत, ओबीसींच्या न्यायाच्या लढ्यात आपला आवाज पुन्हा बुलंद करण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गोव्याच्या भूमीवरून थेट दिल्लीला संदेश दिला. ओबीसींच्या हक्कांसाठी झुंजार लढवय्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी आरक्षणाच्या मर्यादा फोडण्याचा आणि न्यायाच्या कवचाला अधिक बळकटी देण्याचा ठाम संकल्प मांडला.
वडेट्टीवार यांनी स्पष्ट इशारा दिला की, ज्याची जितकी संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी, हे तत्त्व पाळल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही. 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेला ते थेट आव्हान देत वडेट्टीवार म्हणाले, 27 टक्के नको, जर ओबीसींची संख्या 65 टक्के असेल तर 65 टक्के आरक्षण द्या. अन्यथा, हा समाज कायमच अन्यायाला बळी पडेल. जातनिहाय जनगणना घोषित केली असली तरी तिची पद्धत अद्याप स्पष्ट नाही. ती SC, ST, OBC, Minority व Other या सविस्तर वर्गवारीनुसार होणे आवश्यक आहे, असा त्यांचा आग्रह होता.
Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला
शंभर टक्के स्कॉलरशिप
इतकेच नव्हे तर, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या 50 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेची आठवण त्यांनी करून दिली. वडेट्टीवार यांनी आताच्या राज्यकर्त्यांना धाडसी मागणी घातली की, 50 टक्के नको, तर थेट 100 टक्के स्कॉलरशीप द्या. हा निर्णय इतिहास घडवेल आणि भविष्यातील पिढ्यांच्या प्रगतीचे पायाभरण करेल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, खरा ओबीसी कधीच बाजूला पडता कामा नये. जर ओबीसी समाज दुर्लक्षित झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारण्याचा संकल्प अपुरा राहील, असे ते ठामपणे म्हणाले.
Devendra Fadnavis : सलीम-जावेदची स्क्रिप्ट बंद करा, लोकं आता ओळखतात
राजकीय प्रवासातील आठवण
वडेट्टीवारांनी आपल्या राजकीय प्रवासातील एक आठवणही उपस्थित केली. त्यांनी सांगितले, मी मंत्री होण्यापूर्वी ओबीसीचा आवाज कमी झाला होता. जालन्यातील सभेतून पुन्हा त्या दबलेल्या आवाजाला धार देण्याचे काम मी केले आणि तिथूनच हा एल्गार पुन्हा सुरू झाला. हा माझ्यासाठी केवळ राजकीय नव्हे, तर अभिमानाचा क्षण आहे.
गोव्याच्या रंगीबेरंगी वातावरणात भरलेला ‘राष्ट्रीय महाअधिवेशन’ हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर तो ओबीसी न्यायासाठीच्या लढाईचा रणशिंग होता. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजय वडेट्टीवारांची ही गर्जना ऐकणारा प्रत्येक जण एका नव्या जोशाने भारावून गेला.