महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राजकारण तापले असून, मराठवाड्यात तणाव आणि ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मराठवाड्यातील सामाजिक अस्वस्थता आणि वाढता तणाव यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी आरक्षणाला होणाऱ्या नुकसानाचे ठोस पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रश्नावर सरकारची उदासीनता आणि दुटप्पी धोरणे यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी सरकारच्या मंत्र्यांवरही निशाणा साधला. विशेषतः ओबीसी उपसमितीतील सदस्य असलेल्या मंत्र्यांनी बैठकीत ठोस भूमिका न मांडता बाहेर केवळ वक्तव्यबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या निर्णयामुळे मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील परिस्थिती चिघळली आहे. या गंभीर समस्येकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
महायुतीचा जातीय खेळ
महायुती सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे. वडेट्टीवार यांनी सरकारवर जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचा आणि सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आरोप केला. शाळांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले जात असल्याच्या घटना आणि समाजात पसरलेला द्वेष यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारच्या दुटप्पी धोरणांमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण होत नसल्याचा दावा त्यांनी केला. सर्वपक्षीय चर्चेतून या समस्येवर तोडगा काढण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
Yashomati Thakur : भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राला गटारात बुडवलं
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेचा वडेट्टीवार यांनी तीव्र निषेध केला. अशा खालच्या पातळीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग मानता येणार नाही, असे त्यांनी ठणकावले. पडळकरांच्या वक्तव्यामागील सूत्रधार कोण आणि त्यांना कोण पाठबळ देत आहे, याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सरकारला जबाबदार धरण्यासाठी वडेट्टीवार यांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन समाजाला केले.