महाराष्ट्र

Congress : मनपाच्या कानावर पडले कुंड्यांचे आवाज

Nagpur Municipal Corporation : नागरी समस्यांवर विकास ठाकरे यांची हाक

Author

नागपूरच्या नागरी समस्यांवर प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत मनपाच्या मुख्यालयावर संतप्त आंदोलन छेडलं. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या कुंड्या फोडत निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला.

नागपूर शहरातील नागरी समस्यांवर प्रशासनाचा कानाडोळा सुरूच असल्याने अखेर संतप्त नागपूरकर रस्त्यावर उतरले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई आणि वाढते कर यावर उपाययोजना करण्यास अपयशी ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेविरोधात आज काँग्रेसतर्फे आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसने महापालिका मुख्यालयावर संतप्त मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून कार्यालयातील फुलांच्या कुंड्या फोडून संताप व्यक्त केला.

महापालिकेच्या चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारामुळे शहराचा विकास ठप्प झाला असून, नागपूरकरांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाचा हा बेजबाबदार कारभार सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी दिला. यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठनकर यांना शहरातील समस्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करत काँग्रेसने निवेदन सादर केले.

Satej (bunty) Patil : अब की बार, पुन्हा संरक्षणदान

महापालिकेचा ढिसाळ कारभार

नागपूर महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीने नागपूरकरांचे जीवन असह्य केले आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला, पण अजूनही अनेक भागांत नागरिक थेंबाथेंबाला पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून, प्रशासन गप्प आहे. महापालिकेने शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची डागडुजी करण्याऐवजी फक्त कागदी घोडे नाचवले आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याशिवाय, नागरिकांवर महापालिकेने घरपट्टी आणि पाण्याचे वाढीव देयक लादून त्यांचे आर्थिक शोषण सुरू केले आहे. वाढती महागाई आणि करांच्या अन्यायकारक दरवाढीमुळे नागपूरकर संतप्त आहेत.

श्रीमंत दुकानदारांना अभय

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, महापालिका सत्ताधारी गोरगरीब विक्रेत्यांवर कारवाई करत असताना मोठ्या शो-रूम मालकांना अभय देत आहे. हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले जात असताना, बड्या व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे शहरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, प्रशासनातील अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीच हे आंदोलन उभारल्याचे विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले. महापालिकेने नागपूरकरांची सहनशीलता पाहू नये, अन्यथा हे संतप्त आंदोलन अधिक तीव्र करू,असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत

काँग्रेसकडून तीव्र आंदोलन

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्यास भाग पाडण्यासाठी निवेदन दिले. मात्र, जर महापालिकेने नागपूरकरांच्या समस्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केले, तर हे आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी दिला. शहरातील सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हालचाल करावी, अन्यथा रस्त्यावरच याचा निकाल लागेल, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले. या आंदोलनात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. प्रदेश व्यापारी सेल प्रमुख व सरचिटणीस अतुल कोटेचा, सचिव उमाकांत अग्निहोत्री, कमलेश समर्थ, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संजय दुबे, संदेश सिंगलकर, शहर उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, अरुण डवरे, कोमल गजभिये, अक्षय समर्थ, महिला पदाधिकारी नॅश अली, नंदा देशमुख, सुकेशनी डोगरे, अनिता ठेंगरे यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

प्रशासनाने जागे व्हावे

नागपूरकरांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. प्रशासनाने आता लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा नागपूरकरांचे हे रोष महापालिकेच्या निष्क्रियतेला उध्वस्त करेल, असा थेट इशारा काँग्रेसने दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!