पूर्व विदर्भातील सर्वाधिक धान उत्पादक जिल्ह्याच्या राजकारणात अचानक एक बदल घडत आहे. एकाच्या पक्ष प्रवेशानंतर आमदाराचे सुरक्षा कवच आता निघणार आहे. त्यामुळे अनेक दिवस लाल दिव्याची बडदास्त आता जाणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक नवीन अध्याय उलगडताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या रणनितीची जुळवाजुळव सुरू केली आहे. बैठक सत्र, दौरे, चर्चासत्र आणि गुप्त हालचालींची मालिका रंग घेत आहे. जिथे एकीकडे प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांचे दौरे सुरू आहेत. तिथे दुसरीकडे एका विभीषणाच्या ‘एन्ट्री’मुळे एका आमदाराच्या संरक्षण कवचावर काळे ढग दाटले आहेत.
रामायणातील विभीषणाने रावणाच्या साम्राज्याचे गुपित रामाला सांगितले. त्यानंतर रामाला त्याचा वध करणे सोपे झाले. अशाच कथानकाची छाया सध्या एका धान उत्पादक जिल्ह्यातील राजकारणातही उमटताना दिसत आहे. पूर्व विदर्भातील एक प्रभावशाली आमदार, गेली काही वर्षे वाय सुरक्षा कवचात सुरक्षित होता. त्याच्या सुरक्षेवर आता धोक्याची घंटा वाजली आहे. अचानक या सुरक्षा व्यवस्थेवर गंडांतर येत आहे. त्याचे सुरक्षा कवच काढून घेण्याची हालचाल सुरू झाली आहे.
योगायोग की..?
एका पक्षात झालेल्या अलीकडच्या घडामोडींनी वातावरण तापवले आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विभीषणासारख्या एका नेत्यामुळे समीकरणे डळमळीत झालेली दिसत आहेत. जसे रामायणात विभीषणाने रामाला रावणाचे मर्मस्थळ सांगितल्यावर युद्धाचे पारडे बदलले, तसेच या नव्या प्रवेशामुळे एका आमदाराच्या राजकीय कवचावर घाला पडल्याची चर्चा सुरू आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की, सूडनीतीचा भाग? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
वाय सुरक्षा काढण्याची प्रक्रिया राजकीय पातळीवर ही हालचाल एक सामान्य प्रशासकीय निर्णय म्हणून सादर केली जात असली, तरी आतील गोटात काहीतरी वेगळे शिजत असल्याचे संकेत आहेत. आमदाराच्या सुरक्षेची ढाल काढून घेणे ही केवळ योगायोगाची बाब नाही, असे म्हणणारेही कमी नाहीत. व्हीआयपी दर्जा भोगणाऱ्या या आमदाराला आता साधारण श्रेणीत आणण्यात येणार आहे.
रामायणात विभीषणाच्या आगमनानंतर रावणाचे साम्राज्य कोसळण्याची प्रक्रिया जास्त वेगाने सुरू झाली होती. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जणू त्या अध्यायाची पुनरावृत्ती होत आहे. एका नव्या प्रवेशामुळे गुपित, रणनीती आणि कवच या तिन्ही गोष्टींचे संतुलन ढासळताना दिसत आहे. वाय सुरक्षा हटविण्याचा हा निर्णय राजकीय पटलावर आगामी निवडणूक रणधुमाळीतील पहिला झटका म्हणता येईल. विभीषणाची एन्ट्री आणि कवच हटणे, या दोन ओळींमध्येच सत्तेच्या गाभ्यातील कथा दडलेली आहे.
