देशभरातील रस्ता सुरक्षा मोहिम, कडक वाहतूक नियम आणि सीट बेल्ट अनिवार्य करण्याचे धोरण यांचे प्रमुख शिल्पकार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. मात्र आता सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे त्यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ 27 नोव्हेंबर 2025 रोजी शेअर झाला आहे. तो गडकरींच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरच प्रसिद्ध झाला. या ट्विटमध्ये गडकरी म्हणतात ‘महत्त्वाकांक्षी दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे कॉरिडोरचा एक अत्यंत महत्वाचा भाग असलेला प्रतिष्ठित ग्रीनफिल्ड वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा पॅकेज 6 आणि पॅकेज 7 मी पाहणी केली.’
व्हिडीओत गडकरी कारमधून प्रवास करताना दिसतात, ते देखील विना सिटबेल्ट. नियमानुसार वाहकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाला सिटबेल्ट घालणे अनिवार्य आहे. नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या खुर्सापार ‘हायवेट्रॅप’वर दररोज याच कारणामुळे महामार्ग पोलिस शेकडो वाहनं चलान करतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीतून मुंबईला जाणाऱ्या महत्वाकांक्षी एक्सप्रेसवेचा एक महत्त्वाचा भाग पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सोशल मीडिया टीमने हा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये दिसते की गडकरींच्या वाहनाचा स्पीड 130 किलोमीटर मी प्रतितास आहे. कारच्या डॅशबोर्डवर सीट बेल्टचा लाल इशारा ब्लिंक करत असताना, गडकरी मागच्या सीटवर सीट बेल्ट न लावता बसलेले दिसतात.
नेमकं खरं काय?
व्हिडीओ रेकॉर्डिंग गडकरींच्या सोशल मीडिया टीमने केले असल्याचा दावा केला जात आहे. या प्रथमदर्शन दिसते की गडकरी यांनी सिटबेल्ट घातलेलाच नसल्याचं दिसत आहे. याबाबत अद्याप गडकरींच्या कार्यालयाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. गडकरींनी खरच सिट बेल्ट घातलेला नव्हता की त्यांना टार्गेट करणाऱ्यांनी मुद्दाम हा व्हिडीओ ट्रेडिंगमध्ये आणला याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या यामुळे गडकरी चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत.
गडकरी यांनी देशभरात रस्ता सुरक्षेसाठी ओळखले जातात. सीट बेल्ट वापरण्यासाठी त्यांनी ऑनलाइन मिळणारी क्लिप बंद करायला लावली. नियम भंगावर कडक दंडासारखी धोरणं राबवली. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. नियम फक्त जनतेसाठीच आहेत का? जे नियम बनवतात, त्यांनीच पाळले नाहीत, तर आदर्श कुठे राहतो? अशा कमेंट्सनी सध्या गडकरी इंटरनेटवर ट्रोल होताना दिसत आहे.
वाहतूक नियम मोडल्यास नागरिकांना दंड, वाहन जप्ती आणि इतर कारवाई सहन करावी लागते. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांचा कथित नियमभंगाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. नियमांच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्ता सुरक्षा ही फक्त घोषणा नाही. ती दैनंदिन जीवनातील जबाबदारी आहे. नेत्यांनी स्वतः नियमांचे पालन करताना आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्वांसाठी नियम समान राहतील आणि रस्ते सुरक्षित होतील. गडकरी खरचं असे वागले की हा केवळ नजरेचा खेळ आहे हे अद्याप अनुत्तरीत आहे.
