विदर्भात शरद चंद्र पवार गटाला एक नवीन धक्का बसलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील माजी आमदार आता अजित पवार गटात दाखल होणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे तुफान वेगाने वाहत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तब्बल सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर निवडणूक आयोगानेही तयारीला गती दिली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांचा खेळ जोरात सुरू आहे. विशेषतः विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक जवळचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. ज्यामुळे हा पक्ष संकटात सापडल्याचे चित्र आहे.
वर्धा जिल्ह्यातील राजकीय नाट्याने आता नवा रंग पकडला आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगणघाट येथील निखाडे मंगल कार्यालयात गुरुवारी (२१ ऑगस्ट रोजी) शेकडो कार्यकर्त्यांसह ते अजित पवार गटात सामील होणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाने तिमांडे यांना उमेदवारी नाकारली होती. ज्यामुळे नाराज होऊन त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
हिंगणघाटमध्ये राजकीय बदल
गुरुवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे. सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन अजित पवार आपल्या कामाला सुरुवात करतील. त्यांच्या या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण. ही बाजार समिती महाराष्ट्रातील क्रमांक एकची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. येथील सभापती सुधीर कोठारी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी निखाडे सभागृहात राजू तिमांडे यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.
हिंगणघाटच्या राजकीय समीकरणांना तिमांडे यांच्या पक्षांतराने नवा आकार मिळणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या भागात वाढण्याची शक्यता आहे. तिमांडे यांच्या समर्थकांचा मोठा गट त्यांच्यासोबत अजित पवार गटात सामील होत आहे. ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंगणघाटमध्ये नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि प्रशासकीय पकड यामुळे त्यांचा हा दौरा राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे वर्धा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार गटासाठी हा धक्का कितपत परवडणारा आहे, हे येणारा काळच ठरवेल.
Devendra Fadnavis : नागपूर-चंद्रपूरच्या प्रगतीला मिळाली उंच भरारी
