महाराष्ट्र

Subhash Dhote : अकरा महिन्यांचा तपास अजूनही गुलदस्त्यात का?

Chandrapur : राजुरा मतदार संघाचा वाद थांबता थांबेना

Author

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मतचोरी आणि बोगस मतदार नोंदणीचा वाद चांगलाच गाजत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठोस पुरावे सादर करत गंभीर आरोप केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चंद्रपूर जिल्हा सध्या एका विचित्र रहस्याने गाजतो आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात मत चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला, ज्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह हा आरोप मांडला. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, 6 हजार 861 बोगस मतदारांची नोंदणी रोखण्यात यश आले. यावरून आता माजी आमदार सुभाष धोटे यांनी या प्रकरणात ‘मास्टरमाइंड’ कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. धोटे, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी पत्रक जारी करून निवडणूक आयोगाला जाब विचारला. त्यांच्या मते, हे सर्व काही एका संगनमताने घडले आहे. त्यामागे मोठा राजकीय उद्देश दडलेला आहे.

7 हजार 592 अर्जांपैकी 6 हजार 861 बोगस निघाले, हे कसे शक्य? इतकी मोठी रसद कोण पुरवत होते? फोटो, पत्ते, पुरावे सर्व बनावट. हे एका सामान्य व्यक्तीचे किंवा छोट्या गटाचे काम असू शकते का? धोटे यांनी आरोप केला की, आयोग खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर 2024 रोजी राजुरा पोलिस ठाण्यात FIR नोंदवण्यात आली. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पण तरीही, 11 महिने उलटले तरी कारवाई का नाही? हे प्रश्न आता जनतेच्या मनात घुमत आहेत. या प्रकरणात धोटे यांनी आणखी एक धक्कादायक मुद्दा उपस्थित केला.

IPS Archit Chandak : डिजिटल खुणा सांगत होत्या गुपित

आयोग मौन का?

बोगस मतदार त्या गावातील नव्हते, त्यांची ओळख पटत नव्हती. म्हणजे, मतदारसंख्या कृत्रिमरीत्या वाढवून निवडणुकीत फायदा घेण्याचा डाव असावा. पण आयोग मौन का? इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यामागे एखादा संघटित गट किंवा राजकीय पक्ष असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. धोटे यांनी मागणी केली की, आयोगाने पारदर्शकता दाखवावी. मास्टरमाइंड कोण? त्याला अटक का नाही या सर्वामागे सरकारचा दबाव आहे का? हे प्रश्न आता लोकशाहीच्या मुळावर येत आहेत. जनता विचारते, निवडणूक प्रक्रिया इतकी कमकुवत आहे का की, असे प्रकार सहज घडतात? अशातच शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनीही या मुद्द्यावर वाचा फोडली.

चटप यांनी एक व्हिडीओ जारी करून सांगितले की, राजुरा मतदारसंघात तब्बल 29 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली होती. निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर मते मिळवलेल्या चटप यांनी दावा केला की, 6 हजार 861 नावे वगळण्यात आली असली, तरी उरलेली 20 हजार नावे अजूनही बोगस आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जनतेत चर्चा सुरू झाली. चटप यांच्या मते, हे सर्व एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. जिथे मतदार यादीत फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झाला. धोटे आणि चटप यांच्या आरोपांमुळे चंद्रपूरचे राजकारण आता एका थरारक चित्रपटासारखे वाटते. 11 महिने तक्रारी करूनही दोषींची नावे जाहीर होत नाहीत, तपास लटकलेला आहे. आयोग दबावाखाली आहे का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेस पक्षाने मागणी केली की, आयोगाने तात्काळ उत्तर द्यावे मास्टरमाइंड कोण? राजकीय पक्षांचा सहभाग आहे का? रसद पुरवणारे कोण? आणि कारवाई का थांबली? हे प्रकरण केवळ राजुराचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!