
राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात भाषावाद पुन्हा उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर विषयांऐवजी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अधिक गाजत आहे. शेतकरी कर्जमाफी, शिक्षणातील ढिसाळ नियोजन आणि महागाईसारखे प्रश्न अधिवेशनाच्या सावलीत हरवले आहेत. सध्या केंद्रस्थानी आहे तो ‘भाषा’ हा विषय. विशेषत: ‘मराठी विरुद्ध हिंदी’ या चर्चेने पुन्हा एकदा राजकारणात नवे वळण घेतले आहे. भाषेच्या संवेदनशील मुद्यावर बोलताना अनेक नेत्यांनी संयमाचा विसर टाकलेला असताना, याच वादात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं विधान विशेष संतापजनक ठरत आहे.
गायकवाड हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी संबंधित उल्लेख करत, अशा पद्धतीने भाषा आणि बुद्धिमत्ता यांचं अप्रत्यक्ष मूल्यांकन केलं की त्याने जनमानसात खळबळ माजली. संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या, म्हणून ते मूर्ख होते का, असा अप्रत्यक्ष तावाताव त्यांनी मांडला. या वक्तव्याला आता तीव्र राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रीया उमटत आहेत.

Akola : पुतळा जळला, आता विश्वासही फसला; नेत्याचं नाव सांगत विद्यार्थ्यांनाही लुटला
संतापाची लाट
संजय गायकवाड यांच्या विधानावर सर्वप्रथम आणि सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया दिली ती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी. त्यांच्या मते, गायकवाड यांची जीभ आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. अशा वाचाळ वक्तव्यांनी केवळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान होत आहे. त्यांनी कठोर शब्दांत टीका करत संजय गायकवाडांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 50 खोके घेऊन गुजरात्यांसमोर लोटांगण घालणाऱ्याला छत्रपतींचं नाव घेण्याचीही लायकी नाही, असा थेट आणि बिनधास्त इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गायकवाड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची लाट उसळली.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या आणि संभाजी महाराजांच्या शिक्षण आणि ज्ञानयात्रेचा उल्लेख करत, त्या पार्श्वभूमीवर मूर्ख हा शब्दप्रयोग करणं केवळ अक्षम्य नाही तर सामाजिकदृष्ट्याही अशोभनीय आहे. यामुळे संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर फक्त विरोधकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही तुटून पडले आहेत. महापुरुषांच्या इतिहासाचा वापर करणे. त्यांच्या बुद्धिमत्तेवर असे अतिरेकी विधान करणे ही केवळ वाचाळता नव्हे तर उद्दामपणाचं लक्षण आहे, असं मत प्रखरपणे मांडलं जातंय. भाषेच्या मुद्द्यावरून मते मिळवण्यासाठी छत्रपतींच्या प्रतिमेचा गैरवापर करणं, ही गंभीर बाब आहे.
संवेदनशीलता ठळक
संजय गायकवाड यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियांचा पूर उसळला आहे. अनेक नागरिकांनी त्यांचा निषेध करत #गायकवाडमाफकरा, #छत्रपतींचाअपमान असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आणले. मेंढेगिरीची भाषा वापरणाऱ्या नेत्यांना आता जनतेने थेट उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी त्यांना राजकारणात टिकवण्यासाठी छत्रपतींचं नाव घेणं बंद करावं, अशी मागणी केली आहे.
घडलेल्या संपूर्ण प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी दाखवलेली सजगता आणि ठामपणा महत्त्वाचा ठरतो. छत्रपतींच्या सन्मानासाठी त्यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका ही आजच्या राजकीय गोंधळात एक ठाम आवाज ठरतो आहे. अनेकांनी त्यांच्या या बाणेदार वक्तव्याचं समर्थन करत काँग्रेसने या मुद्यावर ठाम भूमिका घेतल्याचं कौतुक केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयोत्सवातील एकतेनंतर मराठी भाषेच्या मुद्द्याने पुन्हा एकदा रंग पकडला आहे. काही नेते मराठी अस्मितेच्या बाजूने उभे राहत असताना, दुसरीकडे संजय गायकवाड यांच्यासारखे लोक विरोधाची मर्यादा पार करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी घेतलेली भूमिका केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महत्वाची मानली जात आहे.