
यवतमाळमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व एका खासगी दलालाला वाहन परवाना देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
शिकवणी क्लास करतो, पण पैशाशिवाय परवाना मिळत नाही. ही तक्रार अगदी खरं ठरली आहे. वाहन परवाना देण्यासाठी शासकीय शुल्काशिवाय अतिरिक्त लाचेची मागणी करणाऱ्या तिघा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांसह एका खासगी एजंटाला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पुसद येथे झालेल्या या कारवाईमुळे आरटीओ खात्यातील अंतर्गत घोटाळे पुन्हा एकदा उजेडात आले आहेत. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
आरोपींमध्ये सुरज गोपाल बाहीते, मयुर सुधाकर मेहकरे, बिभिषण शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. हे तिघेही यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत होते. तसेच बलदेव नारायण राठोड (वाशिम) या खासगी दलालालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुरुवात ७ मे रोजी झाली. जेव्हा एका सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या महिला संचालिकेने लाच मागितल्याबाबत लेखी तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कॅम्पमध्ये सापळा रचला.

Voice of India : खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक मंचावर मांडणार भारताची बाजू
खासगी दलालाची अटक
पडताळणीत समोर आले की, शिकाऊ व कायम वाहन परवाना मिळवून देण्यासाठी हे आरटीओ अधिकारी दर अर्जामागे २०० रुपये अतिरिक्त घेत होते. एकूण १० शिकवणी क्लासेसच्या माध्यमातून दोन हजार रुपयांची लाच खासगी एजंट बलदेव राठोड याच्याद्वारे तक्रारदाराकडून स्वीकारण्यात आली.याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे, यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, मनोज ओरके, व पोलीस अंमलदार अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचीन भोयर, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम, सरिता राठोड आणि चालक अतुल नागमोते यांचा समावेश होता. या धक्कादायक कारवाईनंतर प्रादेशिक परिवहन विभागातील लाचखोरीचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. अधिकृत शासकीय प्रक्रियेला बगल देत, खासगी दलालांच्या माध्यमातून जनतेकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार केवळ लज्जास्पदच नाही तर गंभीर प्रश्नही उपस्थित करतो.
राज्याचे परिवहन मंत्री याकडे गांभीर्याने लक्ष घालतील का? काय कठोर पावले उचलली जातील? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सामान्य नागरिकांमध्येही या कारवाईमुळे संताप व्यक्त होत असून, आरटीओचा परवाना म्हणजे लाच दिल्याशिवाय काहीच मिळत नाही, या समजुतीला आणखी दुजोरा मिळाला आहे.