शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी लाखोंची खंडणी उकळल्याच्या आरोपामुळे प्रशांत डिक्कर अडचणीत आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यावर शेतकऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका शेतकरी महिलेच्या तक्रारीनंतर शेगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शासनाने मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत प्रशांत डिक्कर यांनी प्रति हेक्टर चाळीस लाख रुपयांचा मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा विरोध
जिगाव प्रकल्पाच्या अनुषंगाने शेगाव येथे शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांनी प्रशांत डिक्कर यांना जोरदार विरोध करत, त्यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून डिक्कर यांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच, शेगाव पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या वतीने हिंगणा कवठळ गावाच्या सरपंच पुष्पा संदीप मोरखडे यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे डिक्कर यांच्या विरोधात कलम 308 (2), 308 (3), 308 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, डिक्कर यांनी जिगाव पुनर्वसन प्रकल्पात प्रति एकर चाळीस लाख रुपये मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी केली. काही शेतकऱ्यांनी त्यांना पैसे दिले, तर उर्वरित शेतकऱ्यांकडून अधिक पैशांसाठी दबाव टाकण्यात आला. पैसे न दिल्यास शासनाकडून कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू देणार नाही. तसेच आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना संपवले जाईल, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या कार्यकर्त्यांकरवी ठार मारून गायब करण्याची धमकीही त्यांनी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रशासकीय कारवाहीचा वेग
प्रशांत डिक्कर यांच्या अटकेने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त करत राजकीय दबाव आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या प्रकाराला वाचा फुटली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर खंडणी, धमकी आणि फसवणुकीचे आरोप ठेवून पुढील तपास सुरू केला आहे. प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. पुढील न्यायालयीन कार्यवाहीच्या दिशेने लक्ष केंद्रित झाले आहे. हा प्रकार राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे.
