महाराष्ट्र

Shiv Sena : औरंगजेब हे उद्धव ठाकरेंचे आराध्य दैवत 

Sanjay Nirupam : अजित पवारांच्या वक्तव्यावरही दिली प्रतिक्रिया 

Post View : 20

Author

राज्यात औरंगजेब, दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे. 

महाराष्ट्राचं राजकीय तापमान गेल्या काही दिवसांपासून चांगलंच वाढलं आहे. औरंगजेबाच्या कबरीपासून ते दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना संजय निरुपम यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. आता असं वाटतंय की, औरंगजेब हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आराध्य देव झाला आहे. लवकरच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोशेजारी औरंगजेबाचा फोटो लावलेला दिसेल,” असं वादग्रस्त विधान निरुपम यांनी केलं. या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात

राऊतांच्या विधानावर आक्षेप

संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या आरोपांवर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली. लालकृष्ण अडवाणी यांना कोणत्याही प्रकारे सरकारने नजरकैदेत ठेवलेलं नाही. त्यांचं वय सध्या 95 वर्षांहून अधिक आहे. ते देशाचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांच्या वाढदिवसाला त्यांना प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा देतं.

लालकृष्ण अडवाणींसाठी सर्व प्रकारच्या सुविधा सरकारतर्फे पुरवल्या जात आहेत. कोणताही व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी त्यांच्याच इच्छेनुसार जाऊ शकतो,” असं स्पष्ट करत राऊत यांनी केलेला आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. राऊतांनी अडवाणीजींबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आणि तथ्यहीन आहे. त्यांनी तातडीने हे विधान मागे घ्यावं, अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते,” असा इशाराही निरुपम यांनी दिला.

आदित्य ठाकरेंवर आरोप

दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरूनही संजय निरुपम यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला असं वाटतं की दिशा सालियन हत्याप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी पुढे सांगितलं की, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी स्वतःच स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. कोणीही वडील आपल्या मुलीबद्दल असं खोटं बोलू शकत नाही. संजय निरुपम यांनी पुढे न्यायालयाला विनंती केली की, सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून सत्य समोर येईल.

अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या वक्तव्यावरही संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली. मुस्लिम बांधवांवर कोणीही डोळे उचकून पाहू शकत नाही, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते. यावर निरूपम म्हणाले की, आम्ही कुठल्याही धर्माच्या देशभक्त नागरिकांवर आरोप करत नाही. मात्र, दंगल माजवणाऱ्या कोणत्याही देशद्रोही प्रवृत्तीला माफी दिली जाणार नाही. तो कोणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अजित पवारसाहेब काहीही म्हणोत, देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना वाचवता येणार नाही, असं निरुपम म्हणाले.

संजय निरुपम यांच्या या वक्तव्यांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादळ उठण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने यावर प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट यावर आक्रमक भूमिका घेतील, हे स्पष्ट होत आहे. सध्या औरंगजेबाच्या कबरीपासून ते दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणापर्यंत प्रत्येक मुद्दा तापवला जात आहे. यातून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!