नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा एकदा रणभेरी फुंकली आहे. तपासयंत्रणांच्या माध्यमातून सूडराजकारणाचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रावर थेट निशाणा साधला आहे.
देशातील राजकारण सध्या तप्त आहे आणि या राजकीय तापमानात काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या कारभारावर आणि तपासयंत्रणांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात उभारलेलं आणि देशभक्तीच्या मूल्यांना वाहिलेलं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र हे केवळ एक माध्यम नव्हतं, तर ते स्वातंत्र्य, संविधान आणि सामाजिक एकात्मतेचं प्रतीक होतं. या संस्थेवर आरोप लावणं म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना दुखावण्यासारखं आहे, असा स्पष्ट इशारा सपकाळ यांनी दिला.
Devendra Fadnavis : अमरावतीचा विकास म्हणजे माझ्या आईचे कर्ज फेडणे
ईडीचा राजकीय वापर
सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं की, केंद्र सरकार काँग्रेस पक्षाला आणि विशेषतः राहुल गांधींना घाबरत आहे. या भीतीपोटीच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) वापर करून राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. त्यांनी याला स्पष्टपणे दडपशाहीचा भाग म्हटलं आणि या कारवाईचा तीव्र निषेध केला.
रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीवरही सपकाळांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट केलं की, भाजप गेल्या 11 वर्षांपासून सत्तेत असूनही, त्यांचं वर्तन अद्यापही विरोधकांप्रती द्वेषपूर्ण आणि सूडभावनेनं भरलेलं आहे. कोणताही स्पष्ट पुरावा नसताना ईडीच्या नोटीस पाठवणं हे केवळ लोकशाहीला गालबोट लावणं आहे, असं विधान त्यांनी केलं.
Devendra Fadnavis : सत्तेच्या उंबरठ्यावरून आठवणींच्या अंगणात
सत्ताधाऱ्यांची भीती
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. ही लढाई केवळ एका पक्षाची नव्हे, तर लोकशाहीच्या रक्षणाची आहे. सरकारी यंत्रणांचा असा राजकीय वापर हा संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारा आहे. त्यामुळे काँग्रेस या कारवायांचा सामना निर्धाराने करणार असून लोकशाहीच्या रक्षणासाठी तीव्र संघर्ष करणार आहे, असे सपकाळ यांचे मत आहे.
सपकाळ यांचे हे विधान आगामी राजकीय लढाईसाठीचा नवा संदेश आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसने पुन्हा आक्रमकतेचा झंकार दिला आहे. तपास यंत्रणांच्या वापरासंदर्भात आता सरकारची कसोटी लागणार आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या या भूमिकेने राज्यातील राजकीय समीकरणं अधिकच तापवली आहेत.
