आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अमृत 2.0 अंतर्गत 34.61 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
Bhandara : लाखनी शहरातील नागरिकांनी अनेक वर्षे पाणीटंचाईच्या झळा सहन केल्या. उन्हाळा सुरू झाला की नळ कोरडे पडायचे, पाण्याच्या टँकरची वाट पाहत महिलांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागायचे, तर अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत व्हायचे. मात्र आता या संघर्षाला दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत लाखनी शहराच्या 34.61 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून, या निर्णयामागे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे.
प्रकल्पातून नवीन इन्टेक वेल, जॅकवेल, कच्च्या पाण्याची जलवाहिनी, चार एमएलडी क्षमतेचा आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, नवीन पंपिंग यंत्रणा, उंच जलकुंभ, नवीन वितरण व्यवस्था, एससीएडीए आधारित स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. हा प्रकल्प केवळ पाईपलाईन किंवा जलकुंभ उभारण्यापुरता मर्यादित नसून, तो हजारो नागरिकांच्या आयुष्यातील दिलास्याचा आणि विश्वासाचा नवा अध्याय ठरणार आहे.
Parinay Fuke : विरोधकांचे गैरसमज विरले, दादांचे मुद्दे निर्णायक ठरले!
प्रतीक्षा संपली
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या मंजुरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उभारली जाणारी ही आधुनिक पाणीपुरवठा व्यवस्था लाखनीच्या विकासालाही नवी गती देणार आहे. या मंजुरीबद्दल आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले असून, प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी आपण सातत्याने लक्ष ठेवणार असल्याची ग्वाही दिली आहे. पाण्यासाठीचा संघर्ष संपून प्रत्येक घरात समाधानाचा नळ वाहू लागावा, हीच लाखनीकरांची अनेक वर्षांची इच्छा होती. त्या इच्छेला आता प्रत्यक्ष वास्तवाचे रूप मिळण्याची आशा निर्माण झाली असून, हा दिवस लाखनीच्या विकासाच्या इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे.
