उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन आणि अनपेक्षित वाऱ्याचा झोत जाणवतोय. ज्यांना कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभं केले जात होतं, तेच दोन नेते आज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन बंधूंमध्ये युती होणार का, हा सध्या सर्वांत मोठा चर्चेचा विषय ठरतो आहे. राजकीय रंगमंचावर अनेक नाट्यमय घटना घडत असतात. या दोन नेत्यांचं एकत्र येण्याचं संभाव्य चित्र हे त्या मालिकेतील नवीन ट्विस्ट असल्यासारखं वाटतं.
आमची भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी दिलेली युतीसंदर्भातील संकेतपूर्ण प्रतिक्रिया आता वेगाने चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या संभाव्य युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारकपणे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. जर दोघे एकत्र आले, तर आम्हाला आनंदच आहे. कोणत्याही दोन पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर त्यात वाईट काहीच नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी हेही नमूद केलं की माध्यमं या विषयावर जास्त विचार करत आहेत, त्यामुळे थोडी वाट बघा.
Nana Patole : पाच वर्षांची मेहनत घ्या, सत्ता पुन्हा आपल्या हातात
शिंदे गटाची खदखद
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची एकत्र येण्याची शक्यता म्हणजे फक्त राजकीय युती नाही, तर ती एक भावनिक परतफेडही ठरू शकते. दोघांचे कुटुंबसंबंध लक्षात घेता हे अधिकच महत्त्वाचं ठरतं. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्यात संवादच नव्हता. आज पुन्हा एकत्र येण्याच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत, हेच मोठं घडतंय. मात्र या युतीच्या चर्चेने सत्ताधारी गटात अस्वस्थता निर्माण केल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना जेव्हा याविषयी विचारण्यात आलं तेव्हा ते अस्वस्थ झाले.
काय रे तू? असं म्हणत त्यांनी माईक दूर केला आणि कोणताही खुलासा न करता तिथून निघून गेले. यावरून असं जाणवतं की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे शिंदे गटात खदखद सुरू आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संयमी भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती करावी की नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्यावर बोलण्याचं कारण नाही. असं स्पष्ट करत त्यांनी राजकीय सौजन्य दाखवलं. मात्र, त्यांच्या या विधानामागे नाही म्हणायचंही नाही आणि हो म्हणायचंही नाही अशी एक लवचिकता दिसून येते.
सत्तेची बदलती गणितं
सर्व घडामोडींवरून एक गोष्ट निश्चित आहे. महाराष्ट्राचं राजकारण आता एका नवीन वळणावर येऊन ठेपलं आहे. एकेकाळी एकत्र असलेले आणि नंतर पूर्णपणे वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत का? की हा केवळ राजकीय डावपेच आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकांनी या युतीचं स्वागत केलंय तर काहींनी त्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात याआधीही दोन गटांमध्ये एकत्र येण्याचे वारे वाहू लागले होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वाद आणि पुन्हा एकत्र येण्याचे रंग पाहायला मिळाले होते. आज एकत्र असलेला उद्या विरुद्ध जातो, हीच तर महाराष्ट्राच्या राजकारणाची रचना आहे, हे विधान चुकीचे ठरणार नाही.
