महायुती सरकारवर बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी केली आहे. शेतकरी कर्जमाफीपासून अर्थसंकल्पातील अन्यायापर्यंत, त्यांनी सरकारची अवस्था थेट ‘तीन माकडं’ अशी उघडपणे टीका केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून महायुती सरकारवर घणाघात केला आहे. शेतकरी कर्जमाफी, कृषी क्षेत्रासाठीची तुटपुंजी तरतूद आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता या मुद्द्यांवरून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट शब्दांत निशाणा साधला. सरकारची अवस्था आता तीन माकडांसारखी झाली आहे. एक बोलत नाही, एक पाहत नाही आणि एक ऐकत नाही. अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला.
अमरावतीतील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात एका कार्यक्रमा दरम्यान बच्चू कडू बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत सातबारा कोरा करू, असं प्रत्येक सभेत सांगितलं. पण निवडणुकीनंतर चार महिने उलटले तरी काहीच घडलं नाही. अजित पवार म्हणतात, सरकारकडे पैसेच नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत आणि एकनाथ शिंदेंना तर काही ऐकूच येत नाही. हे सरकार तीन माकडांसारखं झालंय. एकाच्या तोंडावर बोट, दुसऱ्याच्या डोळ्यांवर हात आणि तिसऱ्याच्या कानांवर झाकण, अशी उपरोधिक टीका करत कडूंनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, माओवाद्यांच्या अड्ड्यांचा खात्मा
मला दुःख नाही
बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करत, 75 वर्षे काँग्रेसने आणि 20 वर्षे भाजपने सत्ता उपभोगली. पण शेतकऱ्यांची अवस्था आजही बदललेली नाही. मी पराभूत झालो, याचं दुःख नाही, कारण आता मी शेतकऱ्यांसाठी वेळ देता येतो. माझं बळ आमदारकीत नाही, ते माझ्या धडपडण्यात आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा सक्रिय आंदोलनाचा इशारा दिला.
बच्चू कडूंनी अर्थसंकल्पातील अन्यायकारक वितरणावरूनही सरकारला धारेवर धरले. तामिळनाडू सरकारकडे 3 लाख कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यापैकी 44 हजार कोटी कृषी क्षेत्रासाठी. उत्तर प्रदेशमध्ये 8.5 लाख कोटींपैकी 45 हजार कोटी शेतकऱ्यांसाठी. पण महाराष्ट्रात 7.5 लाख कोटींपैकी केवळ 9 हजार कोटी कृषीसाठी, ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनाचा इशारा
अंधभक्त टाळ्या वाजवतात, पण आम्ही त्यांना सत्य सांगणारच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आता थेट रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांनी जाहीर केलं की, 5 जूनला आम्ही यवतमाळहून नागपूरपर्यंत शक्तीप्रदर्शन करणार. नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे आणि संजय राठोड यांच्या निवासस्थानी आंदोलन करू. जर 15 दिवसांत कर्जमाफीसंदर्भात तारीख जाहीर झाली नाही, तर आम्ही सरकारची चाके अडवू.
त्यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी मोझरी येथे 7 जूनपासून आमरण उपोषण सुरू होईल. मागण्या पूर्ण होईपर्यंत मी त्या जागीच थांबणार आहे. हे आंदोलन म्हणजे सरकारला जाग आणण्यासाठी शेवटचं पण निर्णायक पाऊल आहे, असा थेट इशारा त्यांनी दिला. बच्चू कडू यांचे हे भाषण केवळ टीका नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा आवाज आहे. त्यांच्या शब्दांतून निराशा आहे, पण त्याच वेळी उर्जाही आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की सरकार या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहते का.
