देशासाठी वीरमरण आलेल्या जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला मंत्री उदय सामंत यांनी आंध्र प्रदेशात जाऊन भेट दिली. या भेटीत त्यांनी कुटुंबाला भावनिक आधार देत मुंबईत स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले.
पाकिस्तानसोबतच्या युद्धात शहीद झालेले जवान मुरली नाईक यांचे कुटुंब सध्या त्यांच्या मूळ गावी, आंध्र प्रदेशात वास्तव्यास आहे. त्यांच्या या गावी जाऊन महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कुटुंबीयांना सांत्वन दिले. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नाईक कुटुंबाशी संवाद साधला. या प्रसंगी नाईक यांचे वडील यांनी आपल्या मुलाचे स्मारक मुंबईत त्याच्या जन्मस्थळी व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावर तातडीने प्रतिसाद देत लवकरच मुंबईत शहीद जवान मुरली नाईक यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. उदय सामंत यांनी केवळ एका मंत्र्याची जबाबदारी निभावली नाही, तर शहीदाच्या कुटुंबाला दिलासा देणाऱ्या एका माणसाचा भावनिक हात दिला. त्यांनी आंध्र प्रदेशातील खेडेगावात जाऊन नाईक कुटुंबाशी संवाद साधला. त्यांची व्यथा ऐकून घेतली. शहीद मुरली नाईक यांच्या बलिदानाचा सन्मान राखत, त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी मुंबईत स्मारक उभारण्याचा निर्णय अत्यंत संवेदनशीलतेने घेण्यात आला.
वीरमरणाची कहाणी
मुंबईतील घाटकोपर येथील रहिवासी मुरली नाईक हे केवळ 23 वर्षांचे असतानाच देशसेवेची अखेरची जबाबदारी निभावत उरी येथे पाकिस्तानसोबत झालेल्या लढाईत शहीद झाले. त्यांनी 2022 साली देवळाली, नाशिक येथे ट्रेनिंग पूर्ण करून भारतीय सैन्यामध्ये प्रवेश केला होता. प्रारंभिक पोस्टिंग आसाममध्ये झाल्यानंतर पंजाब आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील उरी येथे त्यांची तैनाती करण्यात आली होती. 9 मे रोजी पहाटे एलओसीवरील गोळीबारादरम्यान त्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले. मुरली नाईक यांचे वडील घाटकोपर भागात मजुरी करतात. संपूर्ण कुटुंब झोपडपट्टीमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहात होते.
नाईक कुटुंब घाटकोपरमधील कामराज नगर झोपडपट्टीत राहत होते. परंतु झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत काही महिन्यांपूर्वी त्यांचे घर तोडण्यात आले. त्यामुळे घर नसल्यामुळे आणि शोकावस्थेमुळे ते सध्या आपल्या मूळ गावी, आंध्र प्रदेशात राहत आहेत. या पाश्र्वभूमीवर उदय सामंत यांनी स्वतः त्यांच्याकडे जाऊन दिलासा देणे हे केवळ एक प्रशासनिक निर्णय नव्हे, तर माणुसकीची एक जिवंत उदाहरण ठरले आहे. मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्या इच्छा आणि स्मृती जपण्यासाठी त्यांनी दाखवलेला पुढाकार उल्लेखनीय आहे.
Vinod Agrawal : गावाकडून गगनाकडे, धावपट्टीवर प्रगतीचा मृदगंध
स्थानिकांची आदरांजली
शहीद मुरली नाईक यांच्या सन्मानार्थ घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 133 मध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिकांनी त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. या श्रद्धांजलीमधून स्थानिकांचा शहीदांप्रती असलेला आदर दिसून आला आहे. मुंबईत स्मारक उभे राहिल्यानंतर शहीद मुरली नाईक यांचे बलिदान अधिक सन्मानित होईल. उदय सामंत यांची ही कृती त्याच्या मागे असलेला संवेदनशील राजकीय दृष्टिकोन स्पष्ट करेल.
