भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तसेच आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने सज्जतेचा बिगुल फुंकला आहे. नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक आढावा बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, सुरक्षेचे प्रमुख अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन वेळोवेळी जे निर्देश देईल. त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता, ही खबरदारी गरजेची असून प्रशासन सजग आहे.
आरोग्य व्यवस्था तयार
डॉ. इटनकर यांनी विभागप्रमुखांना सूचना दिल्या की, सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात कोणतेही दुर्लक्ष करता कामा नये. सर्व शासकीय यंत्रणांनी अधिक सजग व तत्पर राहण्याचे आदेश दिले गेले. मुख्यालयातूनच कामकाज करणे बंधनकारक केले गेले आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी संकट उभे राहू शकते. याची जाणीव ठेवून प्रशासनाने गरजेनुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना आणि आरोग्य संस्थांना त्यांच्या सुविधांची तात्काळ पाहणी करून त्या पूर्ण क्षमतेने वापरण्याजोग्या स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या खाटा, स्ट्रेचर, औषधे आणि मनुष्यबळाची तजवीज आधीच करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय रक्तसाठ्याबाबतही सकारात्मक आणि सजग नागपूरकर नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील निवडक भागांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी स्पष्ट केले की, जर कोणीही समाजमाध्यमांवर चुकीची माहिती, अफवा किंवा गैरसमज पसरवत असेल तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ, गैरवर्तन किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला, तर पोलिसांनी अशा लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागपूरकरांनी डिझेल, पेट्रोल किंवा गॅसच्या तुटवड्याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने पुरेशा प्रमाणात साठा तयार ठेवला आहे. नागरिकांनी गरजेनुसारच इंधन खरेदी करावे. घाईघाईने किंवा साठवणुकीसाठी खरेदी टाळावी, असे प्रशासनाचे स्पष्ट आवाहन आहे.
एकत्रित नियोजनाची हमी
बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, नागपूर सुधार प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मीना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संचालक डॉ. हरिओम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, बी. वैष्णवी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व यंत्रणांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय नागपूर शहराला अधिक सुरक्षित आणि सजग बनवणार आहे.
प्रशासन सज्ज आहे, पोलिस सजग आहेत. आरोग्य यंत्रणा तत्पर आहेत. नागरिकही जबाबदारीने वागत आहेत. यामुळे कोणतीही भीती नाही, फक्त सतर्कता आणि सकारात्मकतेची गरज आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या धोरणात्मक पावलांमुळे संपूर्ण जिल्हा सध्या अलर्ट मोडवर आहे.
