महाराष्ट्र

Praful Patel : सत्तेच्या समरात राष्ट्रवादीचे स्वबळावर सिंहगर्जन

Local Body Elections : नागपुरातून अजित पवार गटाची रणधुरंदर एल्गार घोषणा

Post View : 73

Author

विदर्भात राजकीय रणसंग्रामाचं बिगुल वाजलं आहे. नागपूरहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याच्या निर्धारासह आपल्या प्रचारमोहीमेची जोरदार सुरुवात केली आहे.

विदर्भात आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूक आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या रणनितीची औपचारिक सुरुवात नागपूरमध्ये पार पडलेल्या भव्य विदर्भस्तरीय अधिवेशनातून झाली. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल होते.

या अधिवेशनात विदर्भातील सर्व माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला निवडणूकपूर्व प्रारंभिक बैठक म्हणूनही महत्त्व दिले जात आहे.
या बैठकीत बोलताना प्रफुल पटेल यांनी स्पष्ट सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वबळावर निवडणुकीची तयारी करणार आहे. यासाठी जून व जुलै महिन्यांत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये नियोजनबद्ध बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूरमधील बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.

सदस्य नोंदणी

महायुतीसोबत युतीबाबत विचारल्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “जिथे शक्य असेल तिथे महायुतीसोबत लढू, पण गरज भासल्यास आम्ही स्वतंत्रपणेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे. निकालानंतर जर गरज भासली, तर सरकार स्थापनेसाठी महागठबंधनाला आमचा पाठिंबा राहील. सदस्य नोंदणी मोहीमेसंदर्भात त्यांनी सांगितले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. काही जिल्ह्यांमध्ये चांगले काम सुरू आहे, तर काही ठिकाणी थोडी मागे चाललेली स्थिती आहे. मात्र, तिथेही कार्यकर्त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत, आणि लवकरच मोठ्या प्रमाणावर लोक पक्षात सहभागी होतील, असा विश्वास आहे.

Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यावर उठलेल्या प्रश्नांवर त्यांनी ठाम उत्तर दिले, भुजबळ यांना दिलेले मंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र निर्णय होता. यामागे कोणताही बाह्य दबाव नव्हता. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, इतकी वर्षे आम्ही काँग्रेससोबत मर्यादित जागांसाठी लढत होतो. आता महायुतीचा भाग झाल्यानंतर, भाजपचा विदर्भ आणि राज्यात प्रभाव आहे हे लक्षात घेऊन, आमचं पाठबळ जसजसं वाढेल, तसतसं अधिक जागांची मागणी करण्याचा आमचा हक्क ठरेल. हाच दृष्टिकोन ठेवून आम्ही या निवडणुकीत काम करणार आहोत.”

राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि स्वबळावर लढण्याचा निर्धार, या त्रिसूत्रीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात नवा संदेश देत आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि मोहीम यामुळे विदर्भात राजकीय वातावरण तापू लागले आहे. नागपूरपासून सुरू झालेली ही चळवळ विदर्भातील राजकीय गणित बदलवेल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!