
मराठी भाषेवरील सक्तीचा हिंदीचा निर्णय सरकारने जनतेच्या दबावामुळे अखेर मागे घेतला आहे. 29 जून रोजी संबंधित दोन्ही जीआर रद्द करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेले आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात अनेक धगधगते मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पेटलेला मराठी भाषेचा वाद पुन्हा चांगलाच भडकलेला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी बाकायदा शालेय शिक्षण विभागाचा जीआर जारी करण्यात आला. पण या निर्णयावर महाराष्ट्रभर संतापाचा भडका उडाला. विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
अखेर 29 जून रोजी राज्य सरकारला माघार घ्यावी लागली आणि हा वादग्रस्त जीआर रद्द करण्यात आला. या मुद्द्यावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मराठी अस्मितेसाठी आणि हिंदीच्या सक्तीच्या विरोधात हा मोर्चा होणार होता. मात्र, सरकारच्या मागे हटण्यामुळे हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. सरकारने जरी हा निर्णय मागे घेतला असला, तरीही या मागे कोणाचा दबाव होता आणि सरकार इतक्या हट्टाग्रहीपणे हिंदीसाठी का उभी राहिली होती, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला अचानक आलेलं शहाणपण नव्हे, तर मराठी जनतेच्या प्रचंड दबावामुळे घेतलेली माघार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

Monsoon Session : तोंडाचं बटण बंद नाही केलं तर खुर्चीचा प्लग खेचणारच
संयुक्त महाराष्ट्राची आठवण
राज ठाकरे यांनी सरकारच्या नव्या समितीवर थेट प्रहार करत स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, आता हे खेळ चालणार नाहीत. हे सरकारच्या लक्षात ठेवा त्यांनी ठामपणे सांगितलं की हा निर्णय कायमचा रद्द झालाय असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनता देखील हेच मान्य करतेय. जर पुन्हा याच मुद्द्यावर समितीच्या नावाखाली गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रात त्या समितीला काम करू दिलं जाणार नाही, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे. या संपूर्ण लढ्यात एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली मराठी माणूस अजूनही आपल्या अस्मितेसाठी एकत्र येतो आणि उभा राहतो.
संघर्षात केवळ मनसेच नव्हे, तर अनेक पक्ष, संघटना, आणि सामान्य जनता सहभागी झाली. जर हा मोर्चा झाला असता, तर ते दृश्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारी ठरली आहे. राज ठाकरे यांनीही यावर भाष्य करत म्हटलं तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं तयार आहेत. त्यांनी ज्या भाषेत शिक्षण घेतले, वाढले, ती भाषा त्यांच्यासाठी महत्त्वाची नाही. बहुदा त्यांना कोणालातरी खुश करायचे होते. मराठी माणसाने आता यातून शिकावं जागरूक राहावं, सजग राहावं आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मातृभाषेच्या अस्तित्वाशी तडजोड करू नये.
Monsoon Session : कर्जमाफी, लाडकी बहिण अन् हिंदी सक्तीचा ‘तीन तिघाडा’
संघर्षातून ज्या प्रकारे मराठी माणसाचा एकत्रित आवाज उठला, तो पुढेही असेच टिकून राहिला पाहिजे. हा लढा फक्त विरोधासाठी नाही, तर मराठी भाषेला ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा बनवण्याचा आहे. यासाठी हा राग, हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ द्या, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन केले.