उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवतीर्थवर एकत्र आले. गेल्या काही वर्षांच्या मतभेदानंतर मनोमिलनाचे संकेत.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक आत्मा असलेला गणेशोत्सव यंदा 27 ऑगस्ट 2025 पासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक घरात गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमतोय. गजाननाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. पण यंदाचा गणेशोत्सव फक्त धार्मिक उत्साहापुरता मर्यादित नाही. यंदा या उत्सवाला राजकीय रंग चढलाय. त्यातही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. वर्षानुवर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी गणपतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जवळीक साधली आहे. ही भेट केवळ कौटुंबिक नाही, तर आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी ठरू शकते.
बुधवारी (27 ऑगस्ट रोजी) सकाळी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी पोहोचले. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती विराजमान आहे. राज यांनी स्वतः उद्धव यांना फोनवरून गणपती दर्शनासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले आणि दोन्ही बंधूंनी एकत्र बाप्पाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आज दुपारी राज यांच्या घरी जेवणार आहेत. ज्यामुळे या भेटीला अधिकच जवळीक प्राप्त झाली आहे. यापूर्वी, 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते.
पराभवानंतर नव्या चर्चांना जन्म
आता उद्धव यांनीही राज यांच्या घरी भेट देऊन ही जवळीक अधिक दृढ केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होताना दिसत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढत दिली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजप-पुरस्कृत पॅनेलने बाजी मारल्याने ठाकरे गटाच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
पराभवानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंची ही भेट केवळ धार्मिक सोहळा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते. शिवतीर्थवरील या भेटीत उद्धव आणि राज यांच्यात कोणती चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही भेट मराठी मतांची ताकद एकत्र आणण्यात यशस्वी ठरेल का? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे युतीचा झेंडा पुन्हा फडकेल का? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, पण सध्या तरी गणरायाच्या आशीर्वादाने ठाकरे बंधूंचा हा मीलनमेळा राजकीय वर्तुळात आशेचा किरण निर्माण करत आहे.
