महाराष्ट्र

Shinde-Fadnavis : महायुतीचे दोन शिलेदार, विरोधकांवर भिडले घेऊन तलवार धारदार 

Maharashtra Budget Session : विधानसभेत मुख्यमंत्र्यांची; परिषदेत उपमुख्यमंत्र्यांची दमदार फलंदाजी 

Post View : 34

Author

 विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी महायुतीच्या दोन नेत्यांची दमदार फलंदाजी महाराष्ट्राला बघायला मिळाली. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीच्या नेत्यांना आडव्या हाताने घेतले. 

गेल्या अनेक दिवसांपासून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सामूहिक हल्ला चढवला. विधान सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडीच्या अनेक नेत्यांना टोमणे मारले. याच वेळी विधान परिषदेत बोलत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही आपल्या शब्दांचा दाणपट्टा फिरवला. त्यामुळे आघाडीचे नेते ‘चारोखाने चीत’ झालेत.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. विकास कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असा चिमटाच त्यांनी शिवसेनेला काढला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलणाऱ्यांच्या यादीमध्ये आमदार नाना पटोले यांचे नाव नव्हते. त्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली. नाना पटोले हे विदर्भाचा बुलंद आवाज आहे. त्यांना संधी न देणे म्हणजे विदर्भाचा आवाज दाबण्यासारखे आहे. नाना पटोले यांच्या बद्दल असे बोलत फडणवीस यांनी काँग्रेसचे पाय काँग्रेसच्याच गळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांना शंभर टक्के सौर वीज; स्मार्ट मीटरवाल्यांना सवलत

जयंत पाटलांना सल्ला

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यालाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘स्टाइल’ने उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनाही मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. जयंतराव तुम्ही दादांचेही ऐकत नाही. माझं तर अजिबातच ऐकत नाही. चुकीच्या लोकांसोबत राहता, असं म्हणत फडणवीस यांनी त्यांच्यावरही टीका केली.

विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार किल्ला लढवला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून त्यांनी महाविकास आघाडीवर हल्ला केला. आघाडीचे सरकार असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आणले गेले होते. त्यावेळी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री किती कर्तबगार आहेत, याचे गोडवे गायले गेले. आता कर्नाटकमध्ये मराठी माणसावर हल्ला होत आहे. त्यामुळे जाहिरात बाजी करणारे आता का गप्प आहेत असा सवाल शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही शिंदे यांनी महाविकास आघाडीला सुनावले. ज्यांनी योजनेमध्ये खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. महायुतीची सरकार म्हणजे ‘देना बँक’ आहे. ही बँक पूर्णपणे नफ्यात आहे, असेही शिंदे म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ही घटना 2018 वर्षातील आहे. त्यावेळी आपण मंत्री नव्हतो. पण काही नेत्यांनी कपोलकल्पित गौप्यस्फोट केल्यासारखं केलं. शिंदे अडचणीत येणार, अशा प्रकार केला.

आरोप करणाऱ्यांची आपण बोललो. त्यांना वस्तुस्थिती आधारित माहिती दिली. त्यानंतर आरोप करणारे प्रसार माध्यमांमध्ये गेले. त्यांनी नंतर माफी मागितली. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी दिला. पुरावे असतील तर बोलायला काही हरकत नाही. पण उगाच हवेत गोळीबार करू नका. गोळीबार केला जातो नंतर सगळे फुसके फटाके निघतात, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सुमारे तासभर केलेली ही तुफान फटकेबाजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये चांगलीच लक्षवेधी ठरली.

कविता आणि शेर 

विधानसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक कविता सादर केली. या कवितेमधून त्यांनी विरोधकांना आपली जागा दाखवून दिली. दुसरीकडे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निदा फाजली यांच्या एक शेर सादर केला. यावरून देवेंद्र फडणवीस कवितेतून शेर आणि एकनाथ शिंदे शायरीतून बब्बर शेर ठरले.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!