उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाल्यानंतर, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
देशाच्या राजधानीत नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली आणि यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी बाजी मारत देशाच्या उपराष्ट्रपती पदाचा मान मिळवला. 9 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लीत झालेल्या या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. एनडीएच्या वतीने सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करत 452 मतांसह दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. रेड्डी यांना 300 मते मिळाली. एकूण 767 खासदारांनी या निवडणुकीत मतदान केले. राधाकृष्णन यांनी आपल्या विजयाने एनडीएच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला.
विजयानंतर राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राला कोण नवीन राज्यपाल मिळणार याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ही उत्सुकता संपली आहे. गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता आचार्य देवव्रत हे गुजरातसह महाराष्ट्राच्या राजभवनातही आपली छाप पाडणार आहेत. आचार्य देवव्रत हे नाव राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. एक यशस्वी शिक्षणतज्ज्ञ आणि अनुभवी राजकारणी असलेले आचार्य देवव्रत यांनी यापूर्वी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून चार वर्षे (2015-2019) काम पाहिले आहे.
BJP : ‘शहजाद्या’च्या मत चोरी ड्राम्याला हायकोर्टाचा तिसरा झटका
दोन राज्यांचे आव्हान
देवव्रत यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या सौम्य आणि कार्यक्षम नेतृत्वाने सर्वांचे मन जिंकले. 2019 मध्ये त्यांना गुजरातच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्यांच्यावर महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आचार्य देवव्रत यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि प्रशासकीय अनुभव यामुळे ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वैभवाला नवा आयाम देतील, अशी अपेक्षा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन महत्त्वाच्या राज्यांचे नेतृत्व करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. पण त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन यामुळे ते यशस्वी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या. आता आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्याला नव्या दिशेने नेण्याची अपेक्षा आहे. विशेषतः, आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे, सामाजिक सुधारणा आणि विकास प्रकल्प यावर सर्वांचे लक्ष असेल. आचार्य देवव्रत यांच्याकडे दोन राज्यांची जबाबदारी असल्याने त्यांच्यासमोर वेळेचे आणि प्राधान्यांचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान असेल. तरीही, त्यांच्या अनुभवामुळे आणि शांत स्वभावामुळे ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास अनेक व्यक्त करत आहेत.
Prakash Ambedkar : महाबोधी मुक्तीसाठी वंचित बहुजनांचा जाज्वल्य लढा
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय समन्वय आणि विकासाला चालना देण्यासाठी आचार्य देवव्रत यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या नव्या अध्यायासह महाराष्ट्र एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
