अकोल्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या अल्पवयीनवरील बलात्कार प्रकरणात आयपीएस अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीचा देशभर पाठलाग करून जेरबंद केला.
गणेश विसर्जनाच्या उत्साही वातावरणात, जेव्हा संपूर्ण अकोला रंग आणि ढोल-ताशांच्या गजरात न्हाऊन निघाला होता, तेव्हा एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात काळरात्र ठरली. डाबकी रोड परिसरात, तौहिद समीर बैद या नराधमाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. या भयावह घटनेने शहरात संतापाची लाट उसळली. पण या संकटाच्या काळात अकोल्याला मिळाले एक खरे नायक आयपीएस अर्चित चांडक. अवघ्या काही महिन्यांपूर्वी अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या चांडक यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि धैर्याने हा गुन्हेगार गजाआड केला. गणेश चतुर्थीच्या उत्सवात, जेव्हा घराघरातून लोक मिरवणुकीसाठी बाहेर पडले होते. तेव्हा या मुलीचे कुटुंबही विसर्जनासाठी गेले होते.
घरी एकटी असलेल्या या अल्पवयीन मुलीवर तौहिदने बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण अकोला हादरून गेले. काही संघटनांनी मोर्चे काढले, तर काहींनी आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. पण या सगळ्या गोंधळात अर्चित चांडक यांनी शांतपणे, पण ठामपणे आपली रणनीती आखली. त्यांनी संकल्प घेतला होता की, अकोल्यातील गुन्हेगारी पूर्णपणे मिटवायची आणि हा संकल्प त्यांनी या प्रकरणात खरा करून दाखवला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चांडक यांनी तातडीने पोलिसांना कामाला लावले. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली. या पथकांनी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये आरोपीचा शोध घेतला.
Cricket Controversy : पाकसोबत चौकार मारायचा की स्वाभिमान जपायचा?
कठोर शिस्तीचे उदाहरण
तौहिद हा सराईत गुन्हेगार होता. जो सतत प्रवास करत आपला ठावठिकाणा लपवत होता. सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, झांसी, भोपाळ, गुना, उज्जैन, इंदौर अशा अनेक ठिकाणी तो फिरत होता. पण चांडक यांच्या तीक्ष्ण नजरेपासून तो सुटू शकला नाही. पथकाने 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले, 12 रेल्वे गाड्यांची झडती घेतली आणि तब्बल 5 हजार किलोमीटर प्रवास केला. विमान, रेल्वे, बस, ऑटो अशा सर्व साधनांचा वापर करत पथकाने अथक मेहनत केली. अखेर, इंदौर बायपास येथे तौहिद आढळला. चांडक यांच्या आदेशानुसार, गोपाल ढोले आणि त्यांच्या पथकाने वेषांतर करून सापळा रचला आणि तौहिदला अटक केली. ही अटक इतकी शिताफीने झाली की, सराईत गुन्हेगारालाही पळण्याची संधी मिळाली नाही.
अर्चित चांडक यांनी आपल्या कार्यकाळात अकोल्यातील नागरिकांना एक नवीन विश्वास दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस अपर अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, विजय चव्हाण, गोपाल ढोले यांच्यासह 10 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात अहोरात्र मेहनत केली. सायबर शाखेच्या सहाय्याने तांत्रिक विश्लेषण करत आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. चांडक यांनी केवळ या प्रकरणातच नव्हे, तर अकोल्यातील प्रत्येक गुन्ह्याला आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे. या घटनेने अकोल्यातील नागरिकांना एक संदेश दिला आहे. कोणताही गुन्हेगार आता अर्चित चांडक यांच्या नजरेतून सुटणार नाही. अर्चित चांडक यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी अकोल्याला लाभले आहे. जे गुन्हेगारांना कायमचे गजाआड करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या या यशस्वी कारवाईमुळे अकोल्यातील जनतेला सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. त्यांचे नाव आता प्रत्येकाच्या तोंडी आहे.
