अमरावतीतील राजकमल चौक रेल्वे उड्डाणपूल रखडलेल्या कामांमुळे आणि नादुरुस्त अवस्थेमुळे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिक आणि राजकारणी यांच्यात तीव्र नाराजी आहे.
अमरावतीच्या हृदयस्थानी असलेला राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा उड्डाणपूल, जो शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा जीवनवाहिनी आहे, तो आता पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेली कामे आणि नादुरुस्त अवस्थेमुळे हा पूल वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठीही मृत्यूचा सापळा बनला होता. अखेर, 24 ऑगस्ट 2025 मध्यरात्रीपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला. पण हा निर्णय अमरावतीकरांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. कारण या पुलाच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाले, तरीही तो आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पूल जर पाडायचाच होता, तर मग त्याच्या सौंदर्यीकरणावर अडीच कोटी रुपये का उधळले? यामागे नेमके कोणाचे हितसंबंध दडले आहेत? असा थेट सवाल त्यांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारला आहे. शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला हा पूल बंद झाल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. ऑफिसला जाणारे कर्मचारी, शाळेत जाणारी मुले आणि दैनंदिन व्यवहारांसाठी धावपळ करणारे सामान्य अमरावतीकर या निर्णयामुळे त्रस्त झाले आहेत.डॉ. देशमुख यांनी प्रशासनाच्या कारभारावर ‘हम करे सो कायदा’ अशी टीका केली आहे. या पुलाच्या बंद पडण्यामागील कारणांचा खुलासा ना प्रशासनाने केला, ना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले. हा पूल पूर्णपणे तोडून नव्याने बांधणार की फक्त रेल्वे रुळावरील सांधा बदलणार, याची कोणतीही स्पष्टता नाही.
सौंदर्यीकरणावर अडीच कोटी
एवढ्या महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाची ही बेफिकिरी अमरावतीकरांसाठी शोकांतिकाच आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. शहरातील बहुसंख्य नागरिकांना या पुलाच्या बंद पडण्यामागील कारणांचा थांगपत्ता लागलेला नाही. अचानक वाहतूक बंद झाल्याने अनेकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पुलाची नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणी झाली असती, तर ही वेळ आली नसती, असे डॉ. देशमुख यांचे मत आहे. पुलाचे आयुष्य शंभर वर्षांपर्यंत वाढवता येते, जर वेळीच संरचनात्मक लेखापरीक्षण आणि दुरुस्ती केली गेली असती. पण प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असे त्यांनी ठणकावून सांगितले. विशेष म्हणजे, हा पूल नादुरुस्त असल्याची माहिती स्थानिक खासदारांना दोन वर्षांपूर्वीच होती, असे सांगितले जाते. मग या दोन वर्षांत कोणताही ठोस पाठपुरावा का झाला नाही? असा सवाल डॉ. देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या नादुरुस्त पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा पैसा का आणि कशासाठी खर्च केला? यात टक्केवारीचा खेळ तर झाला नाही ना? असा गंभीर आरोप डॉ. देशमुख यांनी केला आहे. त्यांनी थेट नाव न घेता भाजपच्या खासदारांवर निशाणा साधला. खासदारांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचा दावा केला जातो. पण त्यातून काय साध्य झाले? फक्त कागदपत्रे फिरवण्याचा खेळ झाला, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.हा पूल अमरावतीच्या विकासाचा प्रतीक होता. पण आज तो शहरवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे हा प्रश्न आणखी चिघळला आहे. आता प्रश्न उरतो, की हा पूल पुन्हा कधी उभा राहील? आणि त्यासाठी आणखी किती कोट्यवधी रुपये खर्च होणार? अमरावतीकरांना या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा आहे, पण तोपर्यंत त्यांना वाहतुकीच्या कोंडीतून आणि त्रासातून मार्ग काढावा लागणार आहे.
Chandrashekhar Bawankule : देवाभाऊंची जाहिरात जनतेचे डेव्होशन आहे, प्रमोशन नाही
