अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभावर गडद सावट आले आहे. काही कर्मचारी महिलांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाने कडक पडताळणी सुरू केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचा हात दिला जात आहे. असे असताना, अमरावती जिल्ह्यात मात्र या योजनेचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास मनाई असताना, काहींनी खोटी माहिती देऊन सन्माननिधी उकळल्याचे उघड झाले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार ते पाच कर्मचारी महिलांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात यासंदर्भातील अंतिम अहवाल उजेडात येणार आहे. या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत मिळत आहे. 61 हजार लाभार्थ्यांबाबतचा निर्णयही लवकरच स्पष्ट होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. अंगणवाडी सेविकांच्या सहाय्याने कागदपत्रांची कसून पडताळणी सुरू आहे.
ऐन सणासुदीच्या काळात 61 हजार महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी, वयोमर्यादेचे उल्लंघन, घरात चारचाकी वाहन, सरकारी नोकरी किंवा जास्त उत्पन्न यासारख्या कारणांमुळे या महिलांना सन्माननिधी मिळाला नाही. यामुळे रक्षाबंधनासारख्या सणाच्या वेळी त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या. यापैकी काही महिला या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आहेत. त्यातील एक अमरावती पंचायत समितीत कार्यरत आहे. तिने सवलतीच्या आधारे नोकरी मिळवली असली, तरी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. इतर काही कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
पात्रतेची कसोटी
जिल्ह्यातील 6 लाख 98 हजार पात्र लाभार्थ्यांपैकी 61 हजार महिलांना योजनेचा लाभ नाकारण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 48 हजार महिला या एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याने अपात्र ठरल्या. योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना (वय 18 ते 65 वर्षे) लाभ मिळू शकतो. मात्र, काहींनी हा नियम धाब्यावर बसवून तीन किंवा त्याहून अधिक अर्ज दाखल केले. सध्या या सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू असून, येत्या काही दिवसांत अनेक महिला पुन्हा पात्रतेच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
Sanjay Rathod : हैदराबाद गॅझेटच्या वादात बंजारा समाजाचा हुंकार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा जुलै 2024 मध्ये झाली. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये सन्माननिधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. जुलै आणि ऑगस्ट 2024 चे पैसे ऑगस्टमध्येच एकत्रितपणे जमा करण्यात आले. मात्र, सप्टेंबरमध्ये 61 हजार महिलांना हा लाभ मिळाला नाही. आता प्रशासनाने पडताळणीची प्रक्रिया तीव्र केली आहे. येत्या आठवड्यात अंतिम अहवाल सादर होणार आहे. यामुळे योजनेच्या पारदर्शकतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
