राज्य सरकारकडे इतर कामांसाठी मुबलक निधी असतानाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र एक पैसादेखील उपलब्ध नाही, असा आरोप सातत्याने होत आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गदारोळ मागील काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेले शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत. त्यात कर्जमाफीचा मुद्दा रखडलेला असल्याने आता ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशा वेळी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी लढणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारला जोरदार चिमटा काढला आहे. त्यांच्या तिखट शब्दांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे झाली, पण सरकारच्या कानावर जूही पडली नाही. आता निधी वाटप आणि घोटाळ्यांच्या आरोपांनी वातावरण आणखी गरम झाले आहे.
केंद्राने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1 हजार 600 कोटींचा निधी पाठवला. पण राज्य सरकारने त्यात आपला वाटा अद्याप टाकलेला नाही. हे ऐकून बच्चू कडू चांगलेच भडकले. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 14 हजार कोटींची तरतूद आहे. पण शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटीही नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित करून सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले. शेतकऱ्यांना मदत नाही म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तो रस्ता नसला तरी काही फरक पडणार नाही, पण शेतकरी खचला तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल, असे ते म्हणाले.
Nagpur : निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवर आयोगाचा शिक्कामोर्तब
फडणवीस-पवार निशाण्यावर
नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहेत. पण सरकारकडून केवळ मौन. शेतकऱ्यांना दिलासा द्या, निदान वाईट बोलू नका, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला चढवला. फडणवीस म्हणतात, तुम्ही राजकारण करत आहात. अजित पवार म्हणतात, पैशांचे सोंग करता येत नाही. पण शेतकरी अतिवृष्टी आणि बाजारभावाच्या दुहेरी संकटात सापडला आहे, असे ते म्हणाले. कापसाचा बाजारभाव 6 हजार 500 रुपयांपेक्षा कमी झाला आहे. केंद्र सरकार विदेशातून कापूस आयात करत आहे. अमित शहांना विचारा, का मागवला विदेशी कापूस? आता डोनाल्ड ट्रम्पसमोर शेपटी हलवत आहेत. अशी खोचक टीका करून त्यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरले.
बच्चू कडू यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही जोरदार प्रहार केला. एकीकडे कर कमी केल्याचे सांगितले जाते, दुसरीकडे जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल असल्याचा डांगोरा पिटला जातो. मग दररोज 15 शेतकरी आत्महत्या का करतात? ही अर्थव्यवस्था अदानी आणि अंबानी यांच्यासाठीच आहे का? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणांना उघडे पाडले. केंद्र आणि राज्यातील ताकद शेतकरी आणि दिव्यांगांनाही मिळू द्या, अशी मागणी करत त्यांनी सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवला. शेतकऱ्यांना बँकांकडून 18 टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर उद्योजकांना नाममात्र दराने अर्थसाहाय्य. साधी बकरी घ्यायची म्हटली तरी इतके व्याज? हे अन्यायकारक आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
अतिवृष्टीमुळे घर आणि शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करताना अनेक निकष लावले जातात. नुकसान कमी किंवा जास्त पावसाने झाले हे पाहू नका, तातडीने मदत द्या, अशी त्यांची मागणी आहे.
