माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूरमध्ये आयोजित युवा संसदेत तरुणांना राजकारणाच्या खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याचे आणि नेतृत्वाची संधी देणारे शिक्षण दिले.
महाराष्ट्र म्हणजे देशातील राजकीय उलथापालथींचे केंद्र. या राज्यात दररोज काहीतरी वेगळं घडतं, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. इथे राजकारण म्हणजे तमाशा नाही, तर एक बहारदार रंगमंच आहे. जिथे प्रत्येक डाव हा डावपेचांनी भरलेला असतो. पण एक गोष्ट कायम राहते, ती म्हणजे राजकीय उलथापालथीची सतत धगधगणारी मशाल. या धगधगत्या राजकारणात आता नवे चेहरे आकार घेत आहेत, नव्या वाटा चालत आहेत. या नव्या वाटांवर मार्गदर्शक ठरत आहेत भाजपचे ज्येष्ठ विद्यमान नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. राजकारणाच्या पटलावर बुद्धिबळ खेळणारे डॉ. परिणय फुके सध्या नागपूरच्या विधान भवनात एका आगळ्या वेगळ्या संसदीय सत्राचे नेतृत्व करताना दिसत आहेत. ते म्हणजे युवा संसद 2025.
नागपूरच्या विधान भवनात 29 आणि 30 जुलै रोजी सुरू असलेल्या युवा संसदेत राज्यभरातील तरुणांनी सहभाग घेतला. राजकारण म्हणजे भांडण नाही, तर समजूतदार मंथन आहे, असं स्पष्ट करत डॉ. फुके यांनी तरुणांना स्पष्ट संदेश दिला. विधिमंडळात भांडणं दिसतात, पण त्यामागे चाललेलं विचारमंथन, नियोजन आणि निर्णय प्रक्रियेचे गांभीर्य अनेकदा दुर्लक्षित राहते, असं सांगताना त्यांच्या आवाजात अनुभवाचा भार स्पष्ट जाणवत होता. विधान परिषदेचे आमदार असूनही विधानसभेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली नाही, हे सांगताना त्यांनी सभागृहाची पवित्रता आणि तेथील ऐतिहासिक योगदान सांगितले. या सभागृहात महाराष्ट्राचा आत्मा वावरतो. इथे घेतलेले निर्णय हे भविष्यातील दिशा ठरवतात, असे शब्द म्हणजे तरुणांसाठी चेतनेची घंटा ठरले.
Supreme Court : फडणवीसांचा विजय, पण सुप्रीम कोर्टात अजून ‘चेंडू इनप्ले’
वक्तृत्वाचा सुसंस्कृत सल्ला
आजच्या सोशल मीडियाच्या युगात युवांना वास्तविक संसदीय प्रक्रिया शिकवणं अत्यंत गरजेचं झालं आहे. फेसबुक आणि युट्युबवर लाईक्ससाठी वाद घालणाऱ्या तरुणांना प्रत्यक्ष सभागृहात आपली भूमिका कशी मांडावी, याचे धडे डॉ. फुके सरांनी दिले. तुम्ही वक्तृत्व करायला आला आहात, भांडण करायला नाही, हा त्यांचा सुसंस्कृत सल्ला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विचारांचे चकाकते ठिपके उमटवत गेला. आज या जागेवर बसून ज्या गोष्टी शिकत आहात, त्या उद्या तुमचं नेतृत्व घडवतील. संसद ही केवळ चर्चा करणारी जागा नाही, ती संस्कारांची प्रयोगशाळा आहे, असं म्हणत त्यांनी उपस्थित तरुणांच्या नेतृत्वशक्तीला सल्ला दिला. डॉ. परिणय फुके यांचं राजकारण हे नेहमीच बुद्धिबळाच्या डावांसारखे असते. शांत, पण प्रखर. ते मैदानावर फारसा आवाज करत नाहीत, पण प्रत्येक हालचाल ठरलेली असते.
अशा नेत्याने युवा पिढीला संसदेसारख्या संवेदनशील व्यासपीठावर प्रशिक्षण दिले, हीच गोष्ट त्या तरुणांच्या भविष्यात वळण घालणारी ठरू शकते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की या युवा संसदेमध्ये प्रत्येकाने आपल्या मुद्द्यांना विवेक, संयम आणि अभ्यास यांच्या आधारे मांडावे. डॉ. फुके म्हणाले आज तुम्ही चर्चा करताय, उद्या विधेयक मांडाल. आज तुम्ही पक्षपाती बोलताय, उद्या पक्ष घडवाल. ही युवा संसद म्हणजे तुमच्या नेतृत्वाची पायाभरणी आहे. अशा प्रेरणादायी मार्गदर्शनाने डॉ. परिणय फुके यांनी हे सिद्ध केलं की महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणांची गगनभेदी वादळ निर्माण करायची असतील, तर त्यांना दिशा देणारे नेते आवश्यक असतात. डॉ. परिणय फुके हे त्याच दिशेचा झगमगणारा दीपस्तंभ आहेत.