धम्मचक्र प्रवर्तन दिन 2025 साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेने 20 विशेष गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या आहेत. ज्यामुळे सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारून इतिहासाच्या पानांवर अमर पाऊलखुणा उमटवल्या. हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी एकत्र येतात. श्रद्धा आणि भक्तीने त्यांना अभिवादन करतात. यंदा, धम्मचक्र प्रवर्तन दिन 2025 च्या निमित्ताने, मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक विशेष आणि भव्य उपक्रम हाती घेतला आहे. या उत्सवाच्या काळात प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा. यासाठी मध्य रेल्वेने 20 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राखीव आणि अनारक्षित अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतील.
या विशेष गाड्या प्रवाशांना नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नाशिक रोड यांसारख्या प्रमुख शहरांमधून प्रवासाची संधी देतील. मध्य रेल्वेचा हा उपक्रम प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची हमी देतो. जेणेकरून ते या पवित्र प्रसंगी सहभागी होऊ शकतील. या गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि संरचना यांचा तपशील प्रवाशांच्या सोयीसाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे.
Harshwardhan Sapkal : काळ्या टोपीच्या दहा तोंडांच्या रावणाचे दहन करा
राखीव विशेष गाड्या
मध्य रेल्वेने नागपूर ते अकोला या मार्गावर दोन राखीव विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. गाडी क्रमांक 01132 ही 2 ऑक्टोबरला नागपूर येथून सायंकाळी 6:40 वाजता सुटेल आणि त्याच रात्री 11:30 वाजता अकोल्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01131 ही 3 ऑक्टोबरला अकोलाहून पहाटे 12:20 वाजता सुटेल आणि सकाळी 4:50 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाड्यांचे थांबे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा आणि मुर्तिजापूर येथे असतील. या गाड्यांमध्ये एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, सात शयनयान, पाच सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
मध्य रेल्वेने अनारक्षित गाड्यांचेही नियोजन केले आहे. ज्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना या उत्सवात सहभागी होता येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर (गाडी क्रमांक 01019 आणि 01020), पुणे ते नागपूर (गाडी क्रमांक 01215 आणि 01216), सोलापूर ते नागपूर (गाडी क्रमांक 01029 आणि 01030) आणि नागपूर ते भुसावळ (गाडी क्रमांक 01214 आणि 12113) अशा गाड्या उपलब्ध असतील. या गाड्यांचे थांबे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि अजनी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर असतील. या गाड्यांमध्ये 16 शयनयान/सामान्य द्वितीय वर्ग आणि दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
IPS S Rushikesh Reddy : एआयच्या तीक्ष्ण नजरेने बंदोबस्ताला धार
मेमू विशेष
नाशिक रोड ते नागपूर या मार्गावर मेमू विशेष गाड्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 01231 आणि 01232 तसेच 01233 आणि 01234 या गाड्या 1 ते 4 ऑक्टोबरला दरम्यान धावतील. या गाड्यांचे थांबे मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी येथे असतील. या गाड्या 8 डब्यांच्या मेमू स्वरूपात असतील, ज्या अनारक्षित प्रवाशांसाठी खुल्या असतील.
राखीव गाड्यांसाठी (01132 आणि 01131) आरक्षण www.irctc.co.in आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे. अनारक्षित गाड्यांसाठी तिकिटे यूटीएस अॅप किंवा सिस्टमद्वारे बुक करता येतील. ज्यांचे शुल्क सामान्य सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे असेल. सविस्तर वेळापत्रक आणि माहितीसाठी प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅपवर भेट देण्याची विनंती आहे. मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करते, जेणेकरून गैरसोयी टाळता येतील.
