महाराष्ट्र

Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही

Pahalgam Attack : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी फडणवीस मैदानात

Author

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा धर्म विचारून निर्घृणपणे बळी घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा समाजात फूट पाडण्याचा विघातक प्रयत्न असल्याचे ठाम शब्दांत सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्याला जबाबदार असलेल्या हल्लेखोरांवर कठोर आणि टोकाची कारवाई होणार आहे.

फडणवीस म्हणाले की, मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचे मृतदेह आज राज्यात आणले जातील. त्यासाठी मुंबई, पुणे व श्रीनगर येथे मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा कार्यरत आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन स्वतः श्रीनगरला पोहोचून अडकलेल्या पर्यटकांशी समन्वय साधणार आहेत. तसेच, केंद्र व राज्यातील अनेक मंत्री या प्रक्रियेत सक्रीय सहभागी झाले आहेत. राज्य सरकार सर्व स्तरांवर मदत पुरवत आहे.

Kashmir Attack : कश्मीरमधील दहशतीच्या छायेत नागपूरचं कुटुंब

विमान व मदतीच्या योजना

हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकारने विशेष विमाने उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. काही पर्यटकांना इंडिगोच्या खास विमानाने परत आणले जाणार आहे. तर उर्वरितांसाठी उद्या आणखी एक विमान देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. संबंधित तिकिटांची व वाहतुकीची व्यवस्था सरकार करत आहे.

मंत्रालयात वॉररूम सक्रिय करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक माहिती मिळवता येणार आहे. जखमींच्या उपचारासाठी स्थानिक प्रशासन उत्तम व्यवस्था करत आहे. डॉक्टरांच्या सूचनेनुसार जखमींना राज्यात आणण्याची तयारीही सुरू आहे. कुटुंबीयांना लवकर यायचे असल्यास, सरकार त्यांच्या प्रवासाचीही व्यवस्था करणार आहे.

Dattatrey Hosabale : दहशतवादी हल्ल्याने साऱ्यांना एकत्र येण्याची गरज

दहशतवाद्यांची अस्वस्थता

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत केवळ आधार म्हणून आहे. सरकार या घटनेबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, हल्ल्याचे मास्टरमाईंड लवकरच उघडकीस येतील आणि कठोर शिक्षा होईल.

फडणवीस यांनी नमूद केले की, कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. फुटीरतावाद, दगडफेक आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र, हे पाहून अस्वस्थ झालेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.

घडलेल्या प्रकरणी केंद्र सरकार, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार समन्वयाने काम करत आहेत. हा हल्ला भारतीयत्वावर झालेला आहे. सर्व स्तरांवरील प्रशासन त्याला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक सहभागाच्या बाबतीत सध्या तपास सुरू आहे आणि लवकरच सत्य बाहेर येईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!