कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या ‘रमी’ खेळतानाच्या व्हिडीओने लातूरच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. याच पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा होऊन थेट हाणामारीचा थरार घडला.
लातूरच्या राजकारणात पत्त्यांऐवजी लाथा बुक्क्या चालले आणि त्यामागे होते कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे रमी. सोशल मीडियावर गाजलेला त्यांचा व्हिडीओ फक्त ट्रेंडिंग राहिला नाही, तर लातुरात राजकीय स्फोट घडवून गेला. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावरच घमासान हाणामारी झाली. लातूरच्या मोकळ्या हवेत राजकारणाचं वादळ उसळलं आणि केंद्रस्थानी पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेच .
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये ते अधिवेशनादरम्यान रमी खेळताना दिसतात. विधिमंडळातल्या शिस्तभंगाचं हे प्रकरण सार्वजनिक झाल्यावर जनतेत आणि कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मंत्री साहेब पत्त्यांच्या दुनियेत रमले, हे जनतेला झोंबलं. हे फक्त एक हास्यास्पद दृश्य नव्हतं, तर राज्याच्या शेतकरी धोरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं उदाहरण बनलं.
घोषणांचा भडका
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरमध्ये कार्यकर्ता संवादासाठी आले होते. संवादानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद नेमकी ताशाच्या फडात बदलली. तटकरे बोलत असतानाच अचानक छावा संघटनेचे संतप्त कार्यकर्ते पत्रकार परिषदेत घुसले आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मंचावर थेट पत्त्यांची फेकाफेक केली. हे दृश्य पाहून पत्रकारही क्षणभर हादरले.
ही परिस्थिती पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केला. मग छावा संघटना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये थेट हातघाई झाली. खुर्च्या हवेत उडाल्या, अपशब्दांचा मारा झाला, आणि एका क्षणात पत्रकार परिषद रणभूमीत रूपांतरित झाली. पोलीस आणि आयोजकांनी मोठ्या कष्टाने हे बळकटीने थांबवलं, पण तोपर्यंत लातूरमध्ये राजकीय गोंधळाचं दृश्य स्पष्टपणे तयार झालं होतं.
राजकारणात खळबळ
अलीकडेच 17 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान थेट विधिमंडळाच्या आवारातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि धिंगाणा झाला होता. सभागृहाच्या बाहेरच घडलेल्या या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता लातूरमधील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत घडलेला राडा हा त्याच मालिकेतील पुढचा भाग वाटतो आहे. विरोधक आणि पक्षांतर्गत कार्यकर्ते थेट हाणामारीवर उतरत असतील, तर हे लोकशाहीसाठी गंभीर संकेत आहेत. एकामागून एक सुरू असलेल्या या राड्यांमुळे राज्याच्या राजकारणात हाणामारीचं सत्र सुरू झालं आहे का? असा सवाल जनतेच्या मनात जोरात घुमू लागला आहे.
Vijay Wadettiwar : शेतकरी फासावर अन् कृषीमंत्री पत्त्यांच्या डावावर
वादग्रस्त विधानं
हे प्रकरण काही एकटं नाही. कृषीमंत्री कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींची यादी मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांविषयी एक वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकरी ऐकायला तयार नाही, म्हणून सरकारही काही करू शकत नाही. यामुळे राज्यभरातील शेतकरी संघटनांत संताप उसळला होता. याशिवाय एका सभेत त्यांनी भिकारी ही एक रुपया घेत नाही. परंतु आम्ही एका रुपयात पिक विमा देत आहोत, असे विधान केले होते. इतकंच नाही, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले होते, शेतकऱ्यांनी स्वतःहून निर्णय घेतला. त्याला सरकार जबाबदार नाही, हे विधान देखील समाजमाध्यमांवर ट्रोल झालं होतं.
आता या सर्वांना गालबोट लावणारा नवीन व्हिडीओ म्हणजे विधिमंडळात रमी खेळण्याचा प्रकार! हे केवळ एक साधं शिस्तभंग नव्हे, तर लोकशाहीच्या मूलभूत जबाबदारीचं विडंबन असल्यासारखं दिसत आहे. हे पाहून छावा संघटना आक्रमक झाली आणि त्यांनी थेट कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
विरोधकांचा हल्लाबोल
विरोधकांनी या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली असून सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेस नेते म्हणतात, हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, तर गॅम्बलर सरकार आहे. दुसरीकडे, छावा संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे, कोकाटे मंत्रीपदावर राहिले, तर लढा रस्त्यावरच. लातूरमध्ये घडलेला हा प्रकार केवळ एक छोटा राडा नाही, तर शेतकऱ्यांच्या दुःखावर सुरू असलेला सत्ता टिकवण्याचा ‘खेळ’ उघड करणारा प्रसंग आहे. कोकाटेंच्या या ‘रमी-प्रकरणा’मुळे सरकारची आणि खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीही विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
