वर्धा येथे भाजपच्या मंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी एकजूट, विकासाचा अजेंडा आणि महायुतीच्या ताकदीवर भर देत विरोधकांवर जोरदार टीका केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत निर्णायक तयारी सुरू केली आहे. वर्धा येथे सुरू असलेल्या भाजपच्या मंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सुस्पष्ट आदेश दिले की, मित्र पक्षांवर टीका करण्याची आवश्यकता नाही. मात्र, निवडणूक मैदानात आपले वर्चस्व सिद्ध करणे हेच मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.
फडणवीसांनी यावेळी विरोधकांवरही टीका करत सांगितले की, विकासाच्या मुद्द्यावर आमच्याशी स्पर्धा करण्याची धमक विरोधी पक्षांमध्ये नाही. त्यामुळेच ते रोज नवनवीन खोटे नरेटिव्ह तयार करत जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनसुरक्षा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
Devendra Fadnavis : विदर्भात उमलणार निरागस मुखांवर ‘महा स्माईल्स’
वादांवर निर्वाणीचा इशारा
वर्धा येथे भरलेल्या मेळाव्यात फडणवीसांनी आगामी निवडणुकींची रूपरेषा मांडली. त्यांनी सांगितले की, लवकरच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका अशा टप्प्याटप्प्याने निवडणुक पार पडणार आहेत. या निवडणुक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झाला आहे. स्थानिक पातळीवर जर काही अडचणी असतील, तर त्यावर चर्चा करून मार्ग काढण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. तसेच, जिथे महायुती शक्य नसेल, अशा ठिकाणीही भाजपने संयम पाळत मित्र पक्षांवर कोणतीही टीका करू नये. मात्र, भाजपने आपली संघटना, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनाधार याच्या जोरावर स्पष्ट वर्चस्व निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी बजावले.
फडणवीसांनी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक पातळीवरील वादांवरूनही भाष्य करत कार्यकर्त्यांना सावध केलं. त्यांनी स्पष्ट केले की, भाजप हे एक कुटुंब आहे. कुटुंबात भाऊभाऊत थोडेसे मतभेद होणे स्वाभाविक असले तरी, निवडणुकीच्या तोंडावर एकजुटीने लढण्याचे भान सर्वांनी ठेवावे. अनेक पक्षांत फूट पडल्याने त्यांचा नाश झाला आहे. आपल्यातही असेच वाद निर्माण झाले, तर पक्षच खड्ड्यात जाईल. जो कुणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करेल, त्याला पक्षच खड्ड्यात घालेल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
Gadchiroli : नक्षलवादाने हिरावले पितृत्व, आता वर्दीच्या अभिमानाने सजले हात
दिल्लीतील हस्तक्षेपाचा उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गती आणि दिशा स्पष्ट असून, त्याच दिशेने महाराष्ट्र पुढे जात आहे. मात्र, विरोधक यावर कोणतीच ठोस कामगिरी दाखवू शकत नाहीत. त्यामुळेच ते विकासावर चर्चा टाळून खोटे मुद्दे पुढे करत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा विकासावर चर्चा होते, तेव्हा जनता विरोधकांना प्रश्न विचारते वर्षानुवर्षे सत्ता भोगूनसुद्धा त्यांनी काय साध्य केले? या प्रश्नांपासून वाचण्यासाठीच ते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतात.
फडणवीसांनी जनसुरक्षा विधेयकावरून निर्माण झालेल्या वादांवर भाष्य करत सांगितले की, हे विधेयक तयार करताना सरकारने कोणतीही घाई केली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त समिती स्थापन करून, विरोधी पक्षांच्या नेत्यांना समाविष्ट करून, प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतरच हे विधेयक विधिमंडळात मांडले गेले. मात्र, नंतर विरोधकांना दिल्लीतून ‘इंजेक्शन’ मिळाल्यानंतर काही नेते त्यांना ‘पोपट’ असे संबोधून, या विधेयकाविरोधात बोलू लागले. लोकशाही विरोधी असल्याचा खोटा आरोप करत समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला. हे आंदोलन मुद्दामहून उभारण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.