महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळ्यात 2019 ते 2025 दरम्यान 1हजार 56 बनावट शिक्षकांची शाळांमध्ये नियुक्ती झाल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या वेतनातून कमिशन घेतला जात होता.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव आता एकामागून एक उघडकीस येत आहे. 2019 ते 2025 कालावधीत राज्यभरात एकूण 1 हजार 56 बनावट शिक्षक विविध शाळांमध्ये फसव्या कागदपत्रांच्या आधारावर भरती झाल्याचे समोर आले आहे. हे शिक्षक केवळ बनावट ओळखीतूनच नाही तर त्यांच्या वेतनातून कमिशन वसुलीचा घनघोर भ्रष्टाचार करत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळांमध्ये अशा प्रकारे ‘शिक्षणमाफिया’ कार्यरत असल्याचे या घोटाळ्यामुळे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत हा प्रचंड घोटाळा तपासण्यात राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर व्यस्त आहे. त्यांचा अंतिम चौकशी अहवाल येत्या दहा दिवसांत शिक्षण विभागाकडे सादर होणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक बड्या नावांवर पोलिसांनी हात घातला आहे. संभाजीनगर शिक्षण मंडळाचे सचिव, नागपूर विभागाचे माजी उपसंचालक वैशाली जामदार, तसेच राज्य शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चिंमामण वंजारी यांच्यासह एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra : अनुकंपेची ज्योत, आता विभागनियुक्तीच्या वाऱ्यावर
पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण
आश्चर्याची बाब म्हणजे चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले वंजारीदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे उघड झाले. मात्र या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार वेतन विभागाचा अधीक्षक नीलेश वाघमारे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. उलट, माजी उपसंचालक उल्हास नरड यांच्या तक्रारीवरून त्याचे निलंबन करण्यात आले असले तरी, अटक टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव आणि पुणेपर्यंत पसरलेली आहे. या जिल्ह्यांतील काही खासगी शिक्षणसंस्थाच बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात सहभागी होत्या. पूर्वी रेकॉर्डवर नसलेल्या अनेक मुख्याध्यापक, संस्था चालक व शिक्षक आता तपासाच्या कक्षेत आले आहेत. त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी नागपूरमध्ये पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन माहितीची देवाणघेवाण केली. या घोटाळ्यात गुंतलेल्या प्रत्येक आरोपीवर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. या प्रकरणामुळे सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिक्षक नावाखाली फसवे लोक वर्गात शिकवत असल्याचा विचारच अंगावर शहारा आणणारा आहे. शाळेचा विश्वासार्हता, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सवाल आणि शिक्षण व्यवस्थेची पारदर्शकता हे सर्वच या घोटाळ्यामुळे संकटात आले आहे. आता सगळ्यांच्या नजरा अंतिम चौकशी अहवालाकडे लागलेल्या आहेत. तो अहवाल शिक्षण व्यवस्थेतील गूढांचे बुरखे फाडून टाकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Amravati : मतदारसंघ बदलले, नावे बदलली, आता गावांची हाक न्यायालयीन दालनात