गडचिरोलीत शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर करत मोहिम तीव्र केली आहे. कोरचीसह अनेक भागांतील बाजारपेठा तब्बल २० वर्षांनंतर खुल्या राहिल्या.
कधीकाळी माओवाद्यांच्या छायेत जगणारा गडचिरोली जिल्हा आता हळूहळू बदलत्या वास्तवाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘शहीद सप्ताह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 28 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात पूर्वी भयभीत वातावरणात दुकाने बंद राहत असत, पण यंदा चित्र वेगळे आहे. यावर्षी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरची येथील व्यापाऱ्यांनी तब्बल दोन दशकांनी भीती झुगारून आपली दुकाने उघडली. ही घटना केवळ एक बाजारपेठ उघडल्याची नाही, तर एका नव्या सामाजिक मानसिकतेच्या उदयाची नांदी आहे.
माओवाद्यांनी या कालावधीत बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, यंदा कोरचीसारख्या संवेदनशील भागातही व्यापार सुरळीत सुरू राहिला. पोलिसांच्या सहकार्यामुळे आणि नागरिकांच्या संयम व सहकार्यामुळे ही बदलती हवा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की, यावर्षीचा शहीद सप्ताह हा माओवाद चळवळीतील प्रमुख कमांडर बसवराजूच्या मृत्यूनंतरचा पहिलाच सप्ताह होता. अशा वेळी माओवादी नेहमीपेक्षा अधिक हिंसक हालचाली करतात.
Yashomati Thakur : पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षतेमुळे घरकुल लाभार्थ्यांची कटकट वाढली
व्यापाऱ्यांचा निर्भीड निर्णय
सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलांवर अचानक हल्ले, निष्पाप नागरिकांची हत्या अशा कारवाया या सप्ताहात होत असतात. परंतु यंदा गडचिरोली पोलिसांनी हाय अलर्ट जारी करून सीमावर्ती भागात माओवादविरोधी कारवाया अधिक तीव्र केल्या. परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरळीत सुरू राहिल्या. कोरचीतील व्यापारी वर्गाने ज्या धाडसाने नक्षलांच्या धमक्यांना न जुमानता दुकाने उघडली, तो एक निर्णायक क्षण मानला जातो. 2006 मध्ये डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची भरदिवसा नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर व्यापारपेठ सतत बंद राहायची. 2019 मध्ये स्फोट, 2023 मध्ये खबरी असल्याच्या संशयावरून हत्या अशा घटनांनी जनमानसात भीती निर्माण केली होती. मात्र यंदाचा निर्धार वेगळा होता.
पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे मागील वर्षभरात अनेक जहाल माओवादी नेते चकमकीत ठार झाले आहेत. तर काहींनी आत्मसमर्पण करून शस्त्र खाली ठेवली आहेत. त्यामुळे माओवाद चळवळ बॅकफूटवर गेली आहे. पोलिसांनी उत्तर गडचिरोली माओवाद मुक्त असल्याची घोषणा आधीच केली होती. यंदाचा शहीद सप्ताह हे त्या विधानाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वास वाढल्यामुळे आता माओवाद प्रवृत्तींना जनतेचा पाठिंबा उरलेला नाही. बदलाच्या या वाऱ्याला सामोरे जात कोरचीसारख्या भागात नवे भविष्य घडत आहे. शौर्य, निर्धार आणि सहकार्याच्या या यशोगाथेने गडचिरोलीचा नकाशा नव्याने रंगवण्यास सुरुवात केली आहे.
Nagpur : बनावट शिक्षक प्रकरणाचा फायनल रिपोर्ट अंतिम टप्प्यात