देशाला आत्मनिर्भरतेच्या महामार्गावर वेगाने नेणाऱ्या विकासपुरुष नितीन गडकरींनी नागपूरमध्ये ठाम संदेश दिला, जग झुकतं, पण झुकवणारा पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बळावर भारताला जागतिक नेता बनवण्याचा त्यांचा विश्वास शब्दांतून झळकला.
नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (VNIT) सभागृहात वातावरण भारलेलं होतं. मंचावर देशाच्या पायाभूत विकासाला वेग देणारे आणि दृष्टीकोनातून क्रांती घडवणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उभे होते. चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झळाळी, आवाजात ठामपणा आणि शब्दांत भविष्याचा आराखडा. गडकरींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, त्यांच्या भाषणात केवळ शब्द नसतात, तर त्यामागे स्पष्ट दृष्टिकोन आणि देशासाठीची अपार तळमळ असते.
गडकरींनी सुरुवातीलाच सूचक इशारा देत सांगितलं, देशात सध्या अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे, त्यांची नावं मी घेणार नाही. पण माझा विश्वास आहे की जग झुकतं, फक्त झुकवणारा पाहिजे. त्यासाठी ताकद, बुद्धी आणि योग्य दिशा आवश्यक आहे. त्यांच्या या वाक्यात केवळ प्रेरणा नव्हे तर आत्मनिर्भर भारताचं सूत्र दडलेलं होतं.
Yashomati Thakur : बळीराज्यासाठी काँग्रेस पेटवणार क्रांतीची मशाल
खरी देशभक्ती
गडकरींच्या मते, खरी देशभक्ती फक्त घोषणांमध्ये नसते, तर कृतीत दिसते. आपण जर जागतिक नेता व्हायचं असेल, तर आयात कमी करून निर्यात वाढवणं ही सर्वात मोठी देशभक्ती ठरते, असं ते ठामपणे म्हणाले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान ही जगातील सर्व समस्यांवरची खरी उत्तरं आहेत, असं स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, ज्ञान आणि सामर्थ्याचा योग्य वापर केला तर जगासमोर आपल्याला नतमस्तक व्हावं लागणार नाही.
ट्रम्पच्या कर वाढीनंतर तीन दिवसांनी थेट संदेश
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा केल्यानंतर केवळ तीन दिवसांत गडकरींचा हा ठाम संदेश ऐकायला मिळाला. आता भारतावर एकूण 50 टक्के कर लागू होणार असताना, गडकरींची ही भूमिका जागतिक व्यापार आणि तंत्रज्ञान स्पर्धेतील भारताचा आत्मविश्वास दाखवणारी ठरली.
Prataprao Jadhav : काकांनी फिरविले चक्र; वंदे भारतचा शेगावला थांबा
तंत्रज्ञानात आघाडी घ्या
गडकरींनी थेट इशारा देत म्हटलं, काही देश त्यांच्या आर्थिक बळावर जगाला धमकावत आहेत. त्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. पण जर आपण त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि संसाधनं निर्माण केली, तर आपल्याला कोणालाही धमकावण्याची गरज नाही. त्यांनी भारतीय संस्कृतीची आठवण करून देत सांगितलं की, आपली परंपरा नेहमी ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हीच राहिली आहे. आम्ही कधीही स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचं नुकसान केलेलं नाही.
नितीन गडकरींनी आपल्या खास विकासदृष्टीने उपस्थितांना थक्क केलं. प्रत्येक जिल्हा, राज्य आणि प्रदेशाची आपली वैशिष्ट्यं असतात. जिथे जास्त कचरा, तिथे नव्या प्रकारची उद्योगक्रांती घडवता येते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले संशोधक जर या दिशेने काम करतील, तर देशाचा विकासदर तिप्पट होईल, असा भविष्यवेधी अंदाज त्यांनी वर्तवला.
या भाषणातून गडकरींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते फक्त रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचे मंत्री नाहीत, तर ते विकासाच्या महामार्गावर देशाला वेगाने पुढे नेणारे ‘दूरदृष्टीचे शिल्पकार’ आहेत. त्यांच्या शब्दांत केवळ राजकारण नव्हतं, तर आत्मनिर्भर, सामर्थ्यवान आणि तंत्रज्ञानसंपन्न भारताचं स्वप्न होतं, जे त्यांनी पूर्ण करण्याचा निर्धार उघडपणे व्यक्त केला.
