पाकिस्तानातून विवाहाच्या निमित्ताने भारतात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे फक्त लग्न नाही, तर एक नियोजित ‘क्रॉस बॉर्डर ऑपरेशन’ असू शकतं, असा इशारा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील संभाव्य धोका अधोरेखित करताना ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानातून भारतात विवाहाच्या निमित्ताने येणाऱ्या महिलांची वाढती संख्या ही केवळ प्रेमकथा नाही. हे ‘मॅरेज जिहाद’च्या नावाखाली रचलेले ‘क्रॉस बॉर्डर ऑपरेशन’ असू शकते, असा इशारा त्यांनी दिला. या सर्व प्रकरणाचा तपास देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने व्हावा, अशी मागणी त्यांनी ठामपणे मांडली आहे.
जर हे खरे प्रेमसंबंध आणि विवाह असते, तर त्यामागे सतत संशयाची छाया का राहते? हे लग्न नसून हे एका मोठ्या कटाचा भाग आहे. हे म्हणजे सरळ सरळ टेररिस्ट कृत्य आहे. अशा प्रकारच्या लग्नांना थांबवणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट मत सदावर्ते यांनी व्यक्त केले. त्यांनी याला ‘मॅरेज जिहाद’च्या संज्ञेत बसवून यामागे नियोजित धोरण असल्याचा आरोप लावला.
चौकशीची मागणी
विदर्भ आणि कोकणातील अतिदुर्गम भागांत कार्यरत असलेल्या मदरशांवरही सदावर्ते यांनी संशय व्यक्त केला. यवतमाळ, नांदेड, हिंगोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मदरशांची नियमित आणि खोलवर चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. काश्मीरमध्ये जसा आमच्या नागरिकांनी तिथल्या परिस्थितीचा त्रास सहन केला. तसाच अंतर्गत धोका अन्य भागातही निर्माण होतोय का, याची सखोल तपासणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आपण आता ‘तिसरा डोळा’ उघडायची वेळ आली आहे. या मदरशांमध्ये नक्की काय शिकवलं जातंय? हे देशहितासाठी समजून घेणं अत्यावश्यक आहे, असा सजग नागरिकतेचा संदेशही सदावर्ते यांनी दिला.
पाकिस्तानी घटकांवर प्रश्नचिन्ह
मुंबईतील मुंब्रा व कौसा भागांमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोणते पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत का, याचा खुलासा देखील जनतेसमोर यायला हवा, असे मत सदावर्ते यांनी मांडले. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. पत्रकारांनी मॅरेज जिहादविषयी प्रश्न विचारले, तर त्यांना धमकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही पत्रकारांना घाबरवताय म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजता? माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, अशा शब्दांत त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.
शेतकऱ्यांची वेदना
राजकीय व सामाजिक विषयांबरोबरच सदावर्ते यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणींवरही प्रकाश टाकला. “विदर्भातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. उत्पादन खर्च भरून निघत नाही, आणि बाजारभावही तोटा देतोय. त्यामुळे सध्या सोयाबीनसाठी किमान सात हजार 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, अशी मागणीही सदावर्ते यांनी महायुती सरकारकडे केली. सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खऱ्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. अन्यथा आत्महत्या रोखणे अशक्य होईल,” असा इशारा त्यांनी दिला.
गुणरत्न सदावर्ते यांनी वर्तवलेले आरोप आणि केलेल्या मागण्या निश्चितच गंभीर विचार करण्यास लावणाऱ्या आहेत. ‘मॅरेज जिहाद’, मदरशांची पारदर्शकता, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे वेदनादायक वास्तव, या सर्व मुद्द्यांचा सखोल आढावा घेतला पाहिजे. कारण आजचा निष्काळजीपणा उद्याचं संकट बनू शकतो.