सत्तेच्यामत्तेत डान्सबारवरून केलेल्या एकनाथ शिंदेंच्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट शिंदेंवर हल्लाबोल करत मनात तरी शरम बाळगा असा घणाघात केला आहे.
सत्तेवर टिकून राहण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडलेल्या सत्ताधाऱ्यांकडून आता थेट डान्सबार संस्कृतीचं खुलेआम समर्थन केलं जात आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे एकनाथ शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे समर्थन केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्लज्ज समर्थनावर घणाघाती टीका करत सरकारच्या कथित हिंदुत्वाचा मुखवटा फाडला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, कांदिवलीमधील ‘सावली’ नावाचा डान्सबार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असून, पोलिसांनी या बारवर छापा टाकून नियमभंग झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. या बारवर कार्यवाही झाल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे यांनी या डान्सबारचं सार्वजनिकरित्या समर्थन केलं आहे. ही बाब म्हणजे राज्याच्या नैतिक अधःपाताचं प्रतीक ठरते, असंही त्यांनी म्हटलं.
समाजाच्या मानसिकतेवर घाव
डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुलींबाबत शिंदेंचं समर्थन हे अत्यंत संतापजनक असल्याचं सांगत सपकाळ यांनी विचारलं की, डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? त्यांच्या आयुष्याचा बाजार मांडणाऱ्या ठिकाणांचं समर्थन करणं कोणत्या हिंदुत्वात बसतं? ते पुढे म्हणाले, महिला सक्षमीकरणाच्या गप्पा करणाऱ्या सरकारकडून अशा संस्कृतीचं समर्थन म्हणजे समाजाच्या मानसिकतेवर घाव आहे.
एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणारे डान्सबारवर बोलू नये. यावर प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, भाजपाच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचणारे शिंदे आधी इतिहास वाचा. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच राज्यातील डान्सबार बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसवर बोलण्यापूर्वी तथ्यांची माहिती घ्या.
Prakash Ambedkar : काँग्रेसचा बहुजनद्वेषाचा इतिहास उघडा पाडला
मुख्यमंत्री मौन बाळगतात?
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी प्रश्न केला की, राज्याच्या गृहराज्यमंत्रीच्या कुटुंबाशी संबंधित असलेला डान्सबार नियम तोडत चालवला जातो आणि त्याचे समर्थन सरकारच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याकडून होते. तरीही मुख्यमंत्री मौन बाळगतात? ही फक्त नैतिक चूक नाही, तर सरकारच्या संवेदनशून्यतेचं प्रतीक आहे.
सपकाळ यांनी जोरदार मागणी केली की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानावर खुलासा करावा. डान्सबारची संस्कृती म्हणजे हजारो कुटुंबांची घसरण, आणि ज्यांना अशा गोष्टींचा विरोध करायचा होता, तेच आता पाठबळ देत आहेत, ही शोकांतिका असल्याचं त्यांनी म्हटलं.
राजकीय सत्ता टिकवण्यासाठी नैतिकतेचा बळी दिला जातोय. हिंदुत्वाच्या नावावर डान्सबारचं समर्थन म्हणजे समाजाला दिशाहीन करणं. हे केवळ एक राजकीय वाद नसून महाराष्ट्रातील मूल्यांचा, संस्कृतीचा आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सपकाळ यांनी याच मुद्द्यावरून निष्कर्ष काढला की, “डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुलींचा आवाज बंद केला तरी त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहू शकत नसेल, तर हे सरकार संवेदनाहीनतेच्या रांगेत पहिलं ठरतं.”