महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : स्फोट एकच, न्याय वेगळा, सरकारचं दुटप्पी धोरण

Malegaon : हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात

Author

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर सरकार गप्प का? रेल्वे स्फोटावर सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या राज्यसरकारकडून निवडक न्यायाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

दहशतवादाला कोणताही धर्म, जात किंवा राजकीय ओळख नसते. दहशतवादी हा फक्त आणि फक्त दहशतवादीच असतो. त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या ठाम शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरून सरकारला जाहीर आव्हान दिलं.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि हेमंत करकरे यांच्यासारख्या निष्पक्ष अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीरपणे केला होता. आज या निकालानंतर त्यांचे स्मरण होणे हे स्वाभाविक आहे.

Prakash Ambedkar : सूट-बूट मित्रांचा खेळ, पण भारत ठरतोय बळीचा बकरा

निष्पापांचा बळी

याच वेळी सपकाळ यांनी विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांच्या 2015 मधील विधानाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या होत्या की, केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर एनआयएच्या एका अधिकाऱ्याने मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपींसाठी सौम्य भूमिका घ्या, असं सुचवलं होतं. आज न्यायालयाने सर्व आरोपी निर्दोष ठरवले असले, तरी स्फोट झाला होता. निष्पाप लोक दगावले होते, मग ते कशामुळे आणि कोणी केलं, हा मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, असा सवाल सपकाळांनी उपस्थित केला.

सपकाळ पुढे म्हणाले, दहशतवादविरोधात लढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. जर राज्य सरकारने २००६ वर्षाच्या मुंबई रेल्वे स्फोट प्रकरणात निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातही तशीच भूमिका घ्यायला हवी. दोन्ही प्रकरणांमध्ये निर्दोष सुटका झाली आहे. मग सरकार निवड करून का वागते आहे? या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेला ‘दुटप्पी’ आणि ‘राजकीय रंगलेली’ असं ठासून म्हटलं.

Bacchu Kadu : भक्ती असावी ती कृतीत दिसावी, मूर्ती पूजेपेक्षा माणुसकी जपावी

गांधी हत्या

दहशतवाद विरोधी लढा धर्मावरून, राजकीय लाभासाठी किंवा निवडक प्रकरणांपुरता मर्यादित ठेवणं, हे देशहितासाठी घातक आहे, असा इशारा सपकाळांनी दिला. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी गांधी हत्या प्रकरणावरही भाष्य केलं. देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. त्याने महात्मा गांधींची हत्या केली होती. त्या खटल्यात सात आरोपींपैकी सहा जणांना शिक्षा झाली, पण सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली होती. परंतु कपूर आयोगाच्या अहवालात सावरकरांवर स्पष्ट ठपका ठेवण्यात आलेला आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले, काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाविरोधात उभा राहिला आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तिघांनीही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमावले. या देशात दहशतवादाविरोधात सर्वात मोठी किंमत काँग्रेसने चुकवलेली आहे. त्यामुळे न्यायासाठी लढा देणं हा आमचा धर्म आहे. शेवटी हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मालेगाव स्फोटाच्या खटल्यात निर्दोष सुटका झाली, पण गुन्हा झालाच होता. मग खरा गुन्हेगार कोण? त्याचा शोध घेणं आणि त्याला शिक्षा होईपर्यंत लढा देणं, हेच खरं राष्ट्रधर्म आहे. काँग्रेस यासाठी झगडत राहील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!