काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची शपथ घेल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ16 एप्रिल रोजी पहिल्यांदाच नागपूर दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बहुचर्चित नागपूर दौरा 16 एप्रिल रोजी होत आहे. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा असल्याने जिल्हा व शहर काँग्रेस समित्यांकडून स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, स्वागताच्या गुलालामागे अनेक अवघड प्रश्नांची ढगांची सावली आहे. सपकाळ यांना केवळ पक्षाचे नेतृत्व करायचे नाही, तर एका गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेसचे सखोल पुनर्वसन करायचे आहे. नागपूरमध्ये अलीकडेच उद्भवलेल्या हिंदू-मुस्लिम तणावाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी सद्भावना यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात सामाजिक एकतेचे विघटन सुरू झाले आहे. महायुतीच्या कारभारामुळे राज्यात जाती-धर्माच्या नावावर भेदाभेद, तणाव आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हे महाराष्ट्राच्या सामाजिक परंपरेला धरून नाही. हे दुर्दैवी चित्र आता सामान्य जनतेलाही दिसू लागले आहे, असं सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडावर ही यात्रा केवळ समाजात सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न नाही, तर पक्षांतर्गत असंतोष शमवण्याचीही एक प्रतीकात्मक चाचणी ठरणार आहे.
Devendra Fadnavis : जिथं पोहोचला नाही विकास, तिथून सुरू नवा ध्यास
अंतर्गत गटबाजी
कार्यकर्त्यांच्या बैठकीतूनच पक्षातील सर्व काही सुरळीत नसल्याचेही संकेत आहेत. ग्रामीण काँग्रेसमध्ये केदार समर्थक नेते नाराज आहेत. तर शहरात विकास ठाकरे यांना त्यांच्याच गटातील विरोधकांचे सहकार्य मिळत नाही, अशी चर्चा आहे. याशिवाय, ग्रामीण काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही, आणि प्रभारी अध्यक्षांची अधिकारमर्यादा ही विकास प्रक्रियेत अडथळा ठरत आहे. केदार गटाचा जिल्हा काँग्रेसपासून असलेला अंतराचा सूरही पक्षासाठी चिंतेचा विषय बनला आहे. शहर काँग्रेसमध्ये देखील अध्यक्ष पदावरून धुसफूस सुरू आहे.
विकास ठाकरे यांनी आपली राजीनाम्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती. आणि तो राजीनामा त्यांनी दिला होता. मात्र, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पदावर ठेवले होते. आता नवीन अध्यक्ष म्हणून सपकाळच येणार का, यावर चर्चा रंगली आहे. पक्षात गटबाजीचा भडका विधानसभा निवडणुकांदरम्यान उडाला होता. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमुळे त्यांचे निलंबन झाले होते. आता त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात आणण्याची मागणी एका गटाकडून होत आहे. सपकाळ या मुद्द्यावर काय भूमिका घेणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन्ही बंटी एकत्र
मध्य नागपूर मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे युवा नेते बंटी शेळके यांनी निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षांवर केलेले आरोप अजूनही खुल्या चर्चेचा विषय आहेत. पक्ष या आरोपांवर काय भूमिका घेणार, यावरही अनेकांचे लक्ष आहे. नाराज नेत्यांना बरोबर घेऊन पक्षात एकत्रितपणा निर्माण करणे हे देखील सपकाळांसमोरचे मोठे आव्हान आहे. संपूर्ण दौऱ्याचा केंद्रबिंदू समाजात आणि पक्षात सद्भावना निर्माण करणे. पण हे साध्य करताना सपकाळ यांना केवळ जनतेचं नव्हे, तर काँग्रेसमधील स्वतःच्या घराचं राजकारण सांभाळावं लागणार आहे.
