महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर असंतोष वाढत आहे. यावरून ओबीसी समाजामध्ये प्रचंड रंग असून आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद आता जणू ज्वालामुखीप्रमाणे धगधगत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी उभ्या ठाकलेल्या लढ्याने राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातूनच मराठा आरक्षण द्या अशी आग्रही मागणी करत आंदोलनाचा बिगुल वाजवला होता. सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या खऱ्या. पण यामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली. हा वाद आता थंड होण्याऐवजी अधिकच पेटत चालला आहे. लातूर जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने या तणावाला नवं वळण मिळालं आहे. रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील 35 वर्षीय भरत कराड या तरुणाने आरक्षणाच्या या गुंतागुंतीमुळे निराश होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
भरत कराड याच्या आत्महत्येने लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याच्या भीतीने आणि सरकारच्या धरसोड धोरणांमुळे हा तरुण टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाला, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. सरकार आणि मंत्र्यांनी वारंवार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं असलं, तरी प्रत्यक्षात घडणारं चित्र वेगळं आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं, सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या शासन निर्णयात (जीआर) आधी ‘पात्र’ हा शब्द होता. पण अवघ्या काही तासांत दुसरा जीआर काढून तो शब्द हटवला गेला. यातूनच सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. हा ओबीसी समाजाचा घात आहे. वडेट्टीवार यांनी पुढे सांगितलं की, लातूरमधील भरत कराड याच्या आत्महत्येची जबाबदारी पूर्णपणे महायुती सरकारवर आहे.
Political Drama : नेपाळमधील अराजकतेची लाट, भारतावरही परिणाम होणार?
सामाजिक तणाव
तरुण ऐन उमेदीतील होता. त्याने ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी स्वतःचं बलिदान दिलं. सरकारचा जीआर ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करणारा आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होत आहे. ज्यामुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरीचा धोका वाढला आहे, असं त्यांनी ठणकावलं. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला, धनाढ्य मंत्र्यांनीही ओबीसी प्रमाणपत्रं मिळवल्याची चर्चा आहे. मग सामान्य ओबीसींच्या हक्कांचं काय? या प्रश्नाने सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. लातूरच्या या घटनेने मराठवाड्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. भरत कराड याच्या आत्महत्येचं पत्र, ज्यामध्ये त्याने ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी बलिदान दिल्याचं लिहिलं आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालं आहे. हा जीआर रद्द करा, नाहीतर तरुणांमधील संतापाचा उद्रेक होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
वडेट्टीवार यांनी तरुणांना आवाहन केलं की, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. एकत्र येऊन लढा. भरत कराड याचं बलिदान वाया जाऊ देणार नाही.वडेट्टीवार यांनी सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल आहे. पण सरकारने त्यांना दिलासा देण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावली आहेत. लोकांच्या मनात द्वेष पसरवला जात आहे. त्यांनी मागणी केली की, ओबीसी समाजाचं नुकसान करणारा हा जीआर तातडीने मागे घ्यावा आणि परिस्थिती चिघळण्याआधी मार्ग काढावा. मराठवाड्यातील ही परिस्थिती आता केवळ आरक्षणाच्या लढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. शेतकऱ्यांचं नुकसान, सामाजिक तणाव आणि तरुणांमधील निराशा यामुळे सरकारविरोधात रोष वाढत आहे. वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील तरुणांना संदेश दिला, न्यायालयीन आणि शासकीय पातळीवर लढाई सुरू आहे.
Akola Police : धर्मांतर प्रकरणाने अंधार सांगवीत तणावाचे वारे