
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागपूरच्या वाहतुकीवर डीसीपी अर्चित चांडक यांनी यशस्वी नियंत्रण ठेवले होते. त्यांची अकोल्यात बदली झाल्यानंतर नागपुरातील वाहतूक नियंत्रणाचे पद रिक्त राहिले. त्यामुळे आता या पदावर नवीन चेहऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीची ओळख असलेले नागपूर शहर आता केवळ शिक्षण आणि उद्योगासाठी मर्यादित राहिलेले नाही. ते आता झपाट्याने होणाऱ्या विकासाकडे वाटचाल करत आहे. मुंबईसारख्या शहराची आता नागपूरलाही ओळख मिळत आहे. परंतु झपाट्याने वाढणाऱ्या नागपूरच्या नागरी रचनेत वाहतूक ही नवी डोकेदुखी ठरत आहे. आता या समस्येला ‘शिस्तीचे इंजेक्शन’ देण्यासाठी एक तजेलदार चेहरा पुढे आला आहे. ते म्हणजे IPS अधिकारी लोहित मतानी. सायबर क्राईमसारख्या क्लिष्ट विषयात विशेष शिक्षण घेतलेल्या मतानी यांची वाहतूक विभागाच्या DCP पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.
मतानी यांची ही नेमणूक म्हणजे नागपूरकरांसाठी नव्या आशेचा किरणच. कारण याआधी DCP ट्रॅफिक म्हणून अर्चित चांडक यांनी नागपूरात वाहतूक शिस्तीचे आदर्श ठेवले होते. अवघ्या आठ-दहा महिन्यांत त्यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये असामान्य यश संपादन करत ‘आयकॉनिक ऑफिसर’ म्हणून स्वतःची छाप सोडली होती.अर्चित चांडक यांची अकोल्यात बदली झाल्यानंतर नागपूरच्या ट्रॅफिक विभागात रिक्तता निर्माण झाली होती. हे रिक्त स्थान भरून काढताना मतानी यांच्या रूपाने नागपूर पोलिसांना एक हुशार, अभ्यासू आणि मिशन मोडमध्ये काम करणारा अधिकारी मिळालाय. सायबर क्राइम मध्ये त्यांची कारकीर्द प्रभावशाली ठरलेली असताना, आता ते प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरून ट्रॅफिकच्या गोंधळाला आवर घालणार आहेत.

Sanjay Gaikwad : महापुरुषांवरून वाणीने दिला घाव; मग म्हणाले माफीचे मलम लाव
सुरक्षित रस्त्यांचा निर्धार
DCP लोहित मतानी यांनी गुरुवारी (3 जुलै रोजी) नागपूर शहराच्या वाहतूक विभागाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. कार्यभार घेतल्यानंतर ते थेट अॅक्शन मोडमध्ये गेले. शहरातील वाढत्या वाहनसंख्येचा त्यांनी विशेष उल्लेख केला आणि यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि बेशिस्त पार्किंग यासारख्या समस्यांवर कारवाईचा निर्धार व्यक्त केला. DCP मतानी यांचे लक्ष केवळ नियम तोडणाऱ्यांवर कारवाईत नाही, तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी रचनात्मक उपाययोजनांवर केंद्रित असणार आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मद्यधुंद वाहनचालक, हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार, बेढब पार्किंग करणारे नागरिक यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
शिवाय शहरात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांमुळे वाढणारे अपघात देखील त्यांच्या दृष्टीक्षेपात आले आहेत. ब्लॅक स्पॉट्स अर्थात अपघात प्रवण क्षेत्रांची ओळख पटवून त्या ठिकाणी रस्ते डिझाइनमध्ये आवश्यक सुधारणा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मतानी यांनी नागपूरकरांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियम हे केवळ कायद्याचे पालन नाही, तर आपल्या सुरक्षिततेचा मुलमंत्र आहेत. नागरिकांनी सहकार्य केल्यास शहराच्या रस्त्यांवर शिस्त निर्माण होईल. नागपूरची ट्रॅफिक पोलिस यंत्रणा आता अधिक आधुनिक आणि उत्तरदायी बनवली जाणार आहे. यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच खरी गरज आहे. म्हणूनच, नागपूरच्या रस्त्यांवर आता एका नव्या ‘कोच’ची एन्ट्री झाली आहे. लोहित मतांनी यांची. या नव्या प्रवासात ट्रॅफिक फक्त मवाळ नव्हे, तर स्मार्ट होणार हे नक्की.
Parinay Fuke : निराधारांना दिलासा देणारा ‘मानधन क्रांती’चा पहिला सूर