महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसविण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट दिली होती. मात्र काही कारणांमुळे ही मुदत पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील लाखो जुन्या वाहन धारकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर ही विशेष क्रमांक पाटी बसवणे बंधनकारक करण्यात आले होते. यापूर्वी ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली होती. मात्र, वाहन मालकांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन परिवहन विभागाने आता ही मुदत थेट 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी याबाबत आवाहन करताना सांगितले की, वाहनधारकांनी वेळ न दवडता संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी. विशेष म्हणजे, 30 नोव्हेंबरपर्यंत ज्यांची अपॉइंटमेंट निश्चित होईल, अशा वाहनधारकांवर कारवाई होणार नाही. मात्र, 1 डिसेंबर 2025 पासून अपॉइंटमेंट न घेणाऱ्या व HSRP न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई होईल. राज्यातील अंदाजे 70 टक्के जुन्या वाहनांवर अजूनही HSRP बसवलेले नाहीत, अशी माहिती परिवहन विभागाने दिली. तांत्रिक अडचणी, ऑनलाईन प्रक्रियेतील गुंतागुंत आणि वेळेअभावी अनेक वाहन मालकांनी ही प्लेट अद्याप बसवलेली नाही.
Gadchiroli : राष्ट्रपतींच्या शौर्य पदकाने पोलिस दलाचा अभिमान उंचावला
जुन्या वाहनांवर अपॉइंटमेंट
शासनाने दिलेल्या आधीच्या मुदतीत 15 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी मिळाला. त्यामुळे हा निर्णय घेऊन शासनाने प्रत्यक्षात लाखो वाहन मालकांना धक्का बसण्याऐवजी दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुदतवाढीची मागणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, अजूनही मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP बसवणे बाकी आहे. अशावेळी वाहनधारकांवर थेट दंडाचा बोजा टाकणे योग्य ठरणार नाही, तर त्यांना आणखी थोडा वेळ देणे आवश्यक आहे.
मुदतवाढ जरी दिलासा देणारी असली तरी शासनाने यावेळी कारवाईबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. 30 नोव्हेंबर नंतरही ज्यांनी HSRP बसवलेले नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नसेल, त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई होणार आहे. नियमांनुसार अशा वाहनांवर दंड आकारला जाऊ शकतो, तसेच वाहतूक विभागाच्या वायुवेग पथकांकडून थेट तपासणी केली जाईल. HSRP ही केवळ एक नंबर प्लेट नाही, तर ती वाहन चोरी रोखण्यासाठी, बनावट नंबरप्लेट टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षेसाठी महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे हा नियम केवळ कायदेशीर कर्तव्य नसून, वाहनमालकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे.
Harshwardhan Sapkal : जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसचा तीव्र संघर्ष
शासनाचा उद्देश आता स्पष्ट आहे, दिलासा आणि शिस्त या दोन्हींचा समतोल राखत. राज्यातील सर्व वाहनांवर HSRP बसवणे हेच पुढील काही महिन्यांतील प्राधान्य आहे.
