महाराष्ट्र

Nitin Deshmukh : भारतीय क्रिकेटपटूंना करणार काळ्या रंगात ‘आऊट’

ShivSena UBT : भारत-पाक सामन्यामागे कोणती 'मजबुरी'?

Post View : 39

Author

पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना देशभरात वादाचा विषय ठरत आहे. याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगलाच विरोध दर्शवला आहे.

दुबईच्या मैदानात 14 सप्टेंबर 2025 रोजी, आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना (India-Pakistan Match) खेळवला जात आहे. पण, हा सामना केवळ खेळापुरता राहिलेला नाही. तो आता राष्ट्रीय भावनांचा ज्वालामुखी बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच होणाऱ्या या सामन्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला असून, ‘माझं कुंकू, माझा देश’ या भावनिक घोषवाक्याखाली राज्यभर आंदोलनाचा बिगुल वाजवला आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचं धक्कादायक वक्तव्य. ज्यामुळे वादाला नवी धार दिली आहे.

अकोल्यातील मदनलाल धिंग्रा चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या आंदोलनात नितीन देशमुख यांनी सणसणीत ठणकावले. हा सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना शिवसैनिक आणि देशातील जनता काळं फासणार असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. देशमुख यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केला, पाकिस्तानने भारतावर हल्ले केले, महिलांचा सिंदूर पुसला, मग आता कोणती मजबुरी आहे की भारत हा सामना खेळतोय? आम्ही पाकिस्तानला पाणी देणार नाही, असं म्हणणारे आता त्यांच्याशी मैदानात खेळायला का तयार आहेत? देशमुख यांच्या या प्रश्नांनी उपस्थितांच्या मनात संतापाला फुंकर घातली.

IPS Archit Chandak : चार पथक, दहा अधिकारी अन् पाच दिवस अखंड शोध

महिला आघाडीचा संताप

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने या आंदोलनाला एक भावनिक वळण दिलं आहे. ‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषणेने त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कुंकू आणि बांगड्यांचे पाकिट पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना म्हणजे देशाच्या स्वाभिमानावर घाला आहे, असं म्हणत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अकोल्यातील रस्त्यांवरून ते मुंबईच्या गल्ली-गल्लीपर्यंत, या आंदोलनाने केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर तिखट शब्दांत टीका केली. मोदी-शहा यांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात अनेक महिलांचा सिंदूर पुसला गेला. पण आता जय शहा यांचा ‘इन्ट्रेस्ट’ कशात आहे? हा कोणता पैशाचा खेळ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी भारतीय क्रिकेटपटूंनाही सुनावलं, या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंना लाज वाटायला हवी. त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती नाही का? जर हा सामना खेळला नसता, तर जय शहा त्यांना फासावर लटकवणार होते का? राऊत यांच्या या शब्दांनी वातावरणात आणखी तणाव निर्माण झाला आहे. नितीन देशमुख यांच्या विधानाने हा वाद आता नव्या उंचीवर पोहोचला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतात हल्ले केले, मग आता ही कोणती मजबुरी आहे? आम्ही पाण्यासाठी लढतो, पण क्रिकेटसाठी हात मिळवतो? त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील आंदोलनाने देशभरातील जनतेच्या भावनांना आवाज दिला आहे. हा सामना आता केवळ खेळाचा विषय राहिलेला नाही, तर तो राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे. आता प्रश्न हा आहे की, या सामन्याचा निकाल मैदानात ठरणार की जनतेच्या भावनांमध्ये?

Cricket Controversy : पाकसोबत चौकार मारायचा की स्वाभिमान जपायचा?

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!