नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नवीन आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी, स्मार्ट सिटी, ऑरेंज सिटी आणि मेट्रोसिटी म्हणून गौरवले जाणारे नागपूर शहर. गगनचुंबी इमारती, चकाचक रस्ते, मेट्रोचे जाळे आणि विकासाची झेप यामुळे नागपूरचा चेहरा बदलत आहे. पण या चकचकीत चित्रात एक डाग कायम आहे, तो म्हणजे शहरातील वाहतुकीचा गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर असलेल्या नागपूरात वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी रस्त्यांवरील अराजक कायम आहे. चुकीच्या दिशेने धावणारी वाहने, ट्रिपल सीटवरून उड्या मारणारी तरुणाई आणि वेगाच्या नशेत बेदरकारपणे वाहने हाकणारे चालक यामुळे नागपूरकर हैराण आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण आणि मालमत्तेचे नुकसान यामुळे आता हा प्रश्न गंभीर बनला आहे.
काही दिवसांपूर्वीच आयपीएस लोहित मतानी यांनी भारी वाहने आणि बाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर नो एन्ट्रीचा फर्मान काढून वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न केला. पण तरीही रस्त्यांवरील गोंधळ कमी झाला नाही. आता थेट नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी या अराजकाला लगाम घालण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी एक नवा मास्टर प्लॅन आखला आहे. ज्यामुळे नागपूरच्या वाहतुकीला शिस्त लागेल आणि रस्ते सुरक्षित होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. हा प्लॅन आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा अनोखा संगम. ज्यामध्ये कठोर कारवाई आणि तत्पर अंमलबजावणी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. रवींद्र सिंगल यांनी वाहतुकीच्या गोंधळाला शिस्त लावण्यासाठी कायदेशीर तरतुदी आणि कठोर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे.
पोलिसांना नवीन जबाबदारी
सिंगल यांनी जारी केलेल्या आदेशांनुसार, बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता (BNS) 2023 कलम 281 आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला जाईल. याशिवाय, अल्पवयीन वाहनचालक आढळल्यास त्यांच्या पालकांवर मोटार वाहन कायदा 199A अंतर्गत कारवाई होईल. इतकेच नाही, तर अशा प्रकरणांमध्ये वाहने तात्काळ जप्त केली जातील. हा नियम लागू करताना कोणतीही हयगय होणार नाही, असा इशारा सिंगल यांनी दिला आहे.वाहतूक पोलिसांना यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट किंवा अल्पवयीन चालक आढळल्यास वाहतूक पोलीस तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधतील. त्याचवेळी घटनास्थळी संक्षिप्त निवेदन तयार करून ते पोलीस ठाण्याला सुपूर्द केले जाईल. जेणेकरून वाहतूक पोलिसांचे नियमित कर्तव्य बाधित होणार नाही.
जवळच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्वरित पथक पाठवून FIR नोंदवतील आणि वाहन जप्त करतील. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई नियमांनुसार पूर्ण होईल. सिंगल यांच्या या मास्टरप्लॅनने नागपूरकरांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे. पण प्रश्न असा आहे की, हा प्लॅन खरोखरच रस्त्यांवरील अराजक संपवेल का? आतापर्यंत वाहतूक सुधारण्याचे अनेक प्रयत्न हवेत विरले आहेत. तरीही, सिंगल यांच्या कठोर धोरणामुळे आणि स्पष्ट आदेशांमुळे यावेळी काहीतरी सकारात्मक घडेल, अशी आशा आहे. सर्व पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतीही ढिलाई किंवा विलंब खपवून घेतला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Maharashtra Politics : मत चोरीच्या रणांगणात आंबेडकर, गांधी लढणार एकत्र?
नागपूरच्या रस्त्यांवर सुसाट धावणारी वाहने, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज आणि अपघातांचा धोका यामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना आता शिस्तबद्ध वाहतुकीचे स्वप्न पडू लागले आहे. रविंद्र सिंगल यांचा हा शिस्तीचा डोस खरोखरच प्रभावी ठरेल का, हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की, या नव्या मोहिमेमुळे नागपूरच्या वाहतुकीला एक नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. नागपूरकर आता वाट पाहत आहेत त्या शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत रस्त्यांची.
Parinay Fuke : फाळणीच्या स्मृतीतून आमदाराने दिला एकतेचा संदेश