काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त करून सरकारवर टीका केली. शिक्षकांच्या आंदोलनालाही आवाज दिला.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तापले असतानाच, शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका करत राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पूर्वी एक विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक मिळायचा. आता मात्र सरकार शाळा कशा बंद करता येतील, यावर विचार करत आहे. सरकारने विद्यार्थ्यांची संख्या किती आहे याची मर्यादा लावू नये. एक विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षण मिळायलाच हवे. पटोले यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गाव तिथे शाळा या धोरणाचा उल्लेख करत सध्याच्या सरकारची दिशा वेगळी असल्याची टीका केली.
सरकारने वीसहून कमी विद्यार्थ्यांच्या शाळांवर कारवाई करत शाळा बंद करण्याचा मार्ग स्वीकारल्याने ग्रामीण भागात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. ते पुढे म्हणाले, या धोरणामुळे गावागावातील लहान शाळा संकटात सापडल्या आहेत. सरकारने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि एक विद्यार्थी असला तरी त्याला शिक्षक मिळावा, असे धोरण जाहीर करावे. या मुद्याबरोबरच नाना पटोले यांनी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलनही सभागृहात मांडले. पावसात, चिखलात आंदोलन करणाऱ्या हजारो शिक्षकांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे
शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता ते आश्वासन पोकळ ठरत असल्याचे पटोलेंनी ठणकावले. काल अक्षरशः शिक्षक चिखलात झोपले होते. सरकारने ठरवलेले धोरण कधी अमलात आणणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पटोले यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. शाळा बंद करण्याचा निर्णय अजिबात घेतलेला नाही. फक्त आधीपासून अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार 20 विद्यार्थ्यांखालची शाळा तपासली जाते. अशा शाळांमध्ये कमीत कमी एक शिक्षक कार्यरत आहे.
गरज भासल्यास सेवानिवृत्त शिक्षकांची मदत घेण्याचाही विचार केला जातो. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र शाळांची टिकावूपणा देखील तितकीच महत्त्वाची आहे, असे भुसे म्हणाले.दादा भुसे यांनी शिक्षकांच्या आंदोलनावर भाष्य करताना स्पष्ट केले की, या विषयावर आंदोलक शिक्षक व मुख्यमंत्री यांच्यात बैठक होणार आहे. त्यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल. त्यांनी आंदोलनकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहनही केले. शिक्षणाच्या नावावर निर्माण झालेली ही अस्वस्थता थांबेल का? की ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षक पुढेही शासकीय अनिश्चिततेच्या चक्रात अडकून राहतील, हे पाहावे लागेल.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या विधान आणि शिस्तीचा शिजवला खमंग संदेश
